शासकीय योजना व उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा कल्पक प्रयत्न
माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे
मुंबई: राज्य शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित चित्रमय प्रदर्शन हे कल्पक, माहितीपूर्ण आणि आकर्षक आहे. जिल्हास्तरावर असे प्रदर्शन आयोजित केल्यास शासनाचे महत्त्वपूर्ण उपक्रम व निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिली.
किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे हुबेहुब उभारलेल्या या प्रदर्शनाच्या परिसरात शासनाचे महत्त्वपूर्ण उपक्रम व माहिती सुंदर रंगसंगती असलेल्या चित्रफलकांतून मांडण्यात आली आहे. येथील विशेष आकर्षणाचा भाग म्हणजे 360 अंशात फिरणारा व्हिडीओ सेल्फी पाँईट. प्रदर्शनाच्या माध्यमातून दोन वर्षपूर्तीचा आलेख या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना पहावयास मिळतो, असे यावेळी राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) गणेश रामदासी, संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे यांनी प्रदर्शन आयोजित करण्यामागची भूमिका आणि संकल्पना यांची माहिती दिली. यावेळी उपसंचालक श्रीमती सीमा रनाळकर उपस्थित होत्या.
यावेळी नाविन्यपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या टीमचे अभिनंदन व शुभेच्छा राज्यमंत्री कु. तटकरे यांनी दिल्या.