सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श हॉटेल व्यावसायिक काळाच्या पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : पुण्यातील सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक, हॉटेल ‘वैशाली’चे मालक जगन्नाथ शेट्टी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं असून सचोटीने व्यवसाय करत पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श हॉटेल व्यावसायिक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, गेली अनेक दशकं पुण्यातील हॉटेल वैशाली, रुपाली आणि आम्रपालीच्या माध्यमातून जगन्नाथ शेट्टी यांनी पुणेकरांच्या हृदयात स्वतंत्र स्थान निर्माण केलं.
सचोटीने व्यवसाय करत पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत मोलाची भर टाकली. त्यांची हॉटेल ही पुण्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींची केंद्र राहिली आहेत. सचोटीने व्यवसाय करतानाच सामाजिक भान जपत जगन्नाथ शेट्टी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांना सढळ हाताने मदत केली. पुणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीतील ते अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीतलं तसेच पुणेकरांच्या मनातलं जगन्नाथ शेट्टी यांचे स्थान कायम राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.