अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला चालना
मुंबई । सह्याद्री लाइव्ह। मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
एअर इंडियाच्या मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्या हस्ते आज करण्यात आला. या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. केंद्रीय नागरी विमान उड्डाण विभागाचे सचिव राजीव बन्सल, एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्बेल विल्सन आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई येथून सुरू झालेली ही थेट सेवा आहे. हा प्रवास आतापर्यंतची सर्वांत लांब अंतराचा हवाई प्रवास आहे. आठवड्यातून तीन वेळा ही सेवा असून त्यानंतर ती दररोज सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
सॅनफ्रान्सिस्को हे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असल्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी ही थेटसेवा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनानंतर आता आंतरराष्ट्रीय प्रवासात वाढ झाली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चोवीस तासात दिड लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबईसह महाराष्ट्रातील लाखो लोक अमेरिकेत स्थायिक असून या सगळ्यांचे हवाईसेवेच्या माध्यमातून जोडणाऱ्या एअर इंडियाशी वेगळं नातं निर्माण झालं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. महाराष्ट्राला देखील जी २० परिषदेच्या बैठकांचा मान मिळाल्याने ही राज्याच्या ब्रॅंडींगची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नुकतेच आमच्या शासनाने राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असून विमानतळ विस्ताराला प्राधान्य दिले आहे. राज्यात प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करणार असून त्यामाध्यमातून हवाईसेवा जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र आवडते ठिकाण असून थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एअर इंडियाने युरोप आणि अमेरिकेतील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी योवळी केले.
केंद्रीय मंत्री सिंदिया यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात करून, मुंबई आणि सॅनफ्रान्सिस्कोशी असलेल्या भावनिक नात्याची आठवण सांगितली. हवाईसेवेच्या क्षेत्रात भारतात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचे सांगत जगात भारत हे नागरी हवाई उड्डाण क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाचा देश असून हवाईप्रवास सेवेला अधिक बळ देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुंबई विमानतळावर विल्सन यांच्या हस्ते प्रवाशांना बोर्डींग पासचे वितरण करण्यात आले.