विविध देशांमधील भारताच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । विविध देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ राजदूत व उच्चायुक्तांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन आपल्या कार्याची माहिती दिली. शिष्टमंडळामध्ये चार मराठी भाषिक राजदूतांचा समावेश आहे.
भारताच्या कंबोडियातील राजदूत डॉ. देवयानी खोब्रागडे, जकार्ता येथे मुख्यालय असलेल्या एसियान दूतावासातील भारताचे राजदूत जयंत खोब्रागडे, चेक गणराज्यातील भारताचे राजदूत हेमंत कोटलवार, इराक येथील भारताचे राजदूत प्रशांत पिसे, चिली येथील भारताचे राजदूत सुब्रत भट्टाचारजी, केमरुन येथील उच्चायुक्त आनिंद्य बॅनर्जी, मलेशियातील उच्चायुक्त बी. एम. रेड्डी व बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त प्रणय कुमार वर्मा यावेळी उपस्थित होते.
राजदूत व उच्चायुक्तांची त्यांची पदस्थापना असलेल्या देशाचे भारताशी संबंध, शैक्षणिक सहकार्य, त्या देशांमधील भारतीयांची स्थिती, संबंधित देशांसोबत भारताचे व्यापार-वाणिज्य व सांस्कृतिक संबंध याबाबत राज्यपालांना माहिती दिली.
कंबोडिया येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जगातील सर्वात मोठ्या अंकोर वाट येथील प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य भारत युनेस्कोच्या माध्यमातून करीत असून भारत व कंबोडियामध्ये थेट विमानसेवा सुरु झाली. तर, त्यातून पर्यटन, आर्थिक तसेच सांस्कृतिक सहकार्य वाढेल, असे डॉ. देवयानी खोब्रागडे यांनी सांगितले. मुंबई व सिंहानूक शहरांमध्ये भगिनी – शहरे करार व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वच आसियान देशांमध्ये भारतीय संस्कृतीची ठळक छाप असल्याचे राजदूत जयंत खोब्रागडे यांनी सांगितले.
भारताच्या विविध देशांमधील दूतावासांचे प्रमुख केवाडिया, गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या १० व्या वार्षिक परिषदेत भाग घेण्यासाठी भारतभेटीवर आले आहेत.