आळंदी यात्रा : कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदी मार्गावर ‘पीएमपी’ विशेष बस
‘पीएमपीएमएल’कडून 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान 188 जादा बसेस सोडण्यात येणार
पुणे – कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी येथे होणाऱ्या यात्रेसाठी ‘पीएमपीएमएल’कडून 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान 188 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. तर, 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान रात्रीदेखील बसेस धावणार आहेत. तर, यात्रेमुळे आळंदी गावातील सध्याच्या बसस्थानकाऐवजी काटेवस्ती येथून संचलन होणार आहे.
कार्तिकी एकादशी आणि संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये स्वारगेट ते आळंदी, हडपसर ते आळंदी, पुणे स्टेशन ते आळंदी, म.न.पा. भवन ते आळंदी, निगडी ते आळंदी, पिंपरी ते आळंदी, चिंचवड ते आळंदी, देहूगांव ते आळंदी, भोसरी ते आळंदी, रहाटणी ते आळंदी या मार्गांचा यामध्ये समावेश आहे.
27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान मार्गावरील 91 आणि जादा 188 अशा 279 बसेस, तर 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान रात्री बससेवा सुरू राहणार आहे. यात्रेसाठी रात्री 10 वाजल्यानंतर जादा बससेवेसाठी सध्याच्या तिकिट दरापेक्षा 5 रुपये जादा आकारण्यात येणार आहेत. तर पासधारकांनादेखील रात्री 11 वाजल्यानंतर जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही. यासह आळंदी ते बहुळगांव हा मार्ग यात्रेच्या काळात पूर्णपणे बंद राहणार असून, वाघोली ते आळंदी या मार्गावरील बसेस मरकळ रस्त्यावरील लक्ष्मी मंगल कार्यालय येथून सुरू राहणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.