पुणे शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली
शिवाजीनगर, निगडी, भोसरीमध्ये सर्वाधिक प्रदूषण
पुणे : शहरातील सर्वच भागांमध्ये हवेच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ असून, परिणामी हवेची गुणवत्ता ढासळली आहे. अभ्यासकांच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा गुणवत्तांक 183 इतका असून, शिवाजीनगर, निगडी आणि भोसरी या ठिकाणी हवेचे सर्वाधिक प्रदूषण होत आहे. शहरात तापमानाचा पारा कमी होत असतानाच, प्रदूषणाचा पारा मात्र वाढत आहे.
थंड वातावरणामुळे हवेच्या प्रदूषणात आणखी भर पडत असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदविले आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) संस्थेच्या “सफर’ उपक्रमांतर्गत देशातील दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या चार महानगरांमधील हवेच्या गुणवत्तेची सातत्याने नोंद घेतली जाते. संस्थेने घेतलेल्या नोंदीनुसार, शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली असून, ती “काहीशी धोकादायक’ या स्तरावर पोहचली आहे.
दरम्यान हवेचा गुणवत्तांक 183 इतका नोंदविण्यात आला असून, प्रामुख्याने पीएम 2.5 या प्रदूषकाचे प्रमाण वाढले असल्याचे या नोंदीतून समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे आगामी दोन दिवसांमध्ये शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ होईल असा अंदाज आयआयटीएम-सफर संस्थेतर्फे वर्तविण्यात आला आहे. शहर परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे.
त्यामुळे हवा जड होऊन तिचे अभिसरण होत नाही. परिणामी हवेतील प्रदूषके एकाच ठिकाणी साचत राहिल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. अधिक काळ या प्रदूषित हवेच्या संपर्कात राहिल्यास मानवी आरोग्यासाठी विविध समस्या उदभवू शकतात, असा इशारा संस्थेतर्फे देण्यात आला आहे.
शहरातील विविध भागांमधील
पीएम 2.5 घटकाचे प्रमाण (प्रति घनमीटरमध्ये)
ठिकाण प्रमाण
- शिवाजीनगर 242
- निगडी 242
- भोसरी 266
- आळंदी 200
- भूमकर चौक 193
- लोहगाव 186
- कोथरूड 162
- हडपसर 101
शहरातील प्रदूषणाचे मुख्य स्रोत :
- वाहतूक
- विविध बांधकामे
- धूळ, धुलिकणाचा प्रसार
- उघड्यावर कचरा जाळणे
- औद्योगिक कामकाज