जिल्ह्यात ‘आयटी’ सह ‘अग्रो इंडस्ट्रीयल पार्क’ उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत
नाशिक । सह्याद्री लाइव्ह । जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याने येथील उद्योग विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच येणाऱ्या काळात नाशिक येथे आयटी व ॲग्रो इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
अंबड रेक्रीएशन सेंटर येथे अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा) व सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. यांच्या अडीअडचणीं बाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री सामंत बोलत होते.
यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, एमआयडीसी चे मुख्य व्यवस्थापक नितीन गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा) चे अध्यक्ष निखिल पांचाळ, मुख्य समन्वयक धनंजय बेळे, सल्लागार समिती ज्ञानेश्वर गोपाळे, सरचिटणीस ललित बुब यांच्यासह विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, जिल्ह्यात सुरूवातीला 100 एकर मध्ये आयटी क्षेत्र उभारण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे कृषी पूरक व्यवसाय व प्रक्रीया उद्योगांना विकसित करण्यासाठी नाशिकमध्ये आयटी व ॲग्रो इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यासाठी शासनामार्फत मदत करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात डाटा सेंटरचा मोठा प्रकल्प लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही देखील उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी दिली.
औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पाणी, वीज व रस्ते यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी दरमहिन्याला जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांनी जिल्ह्यातील उद्योजकां समवेत बैठकांचे आयोजन करण्यात यावे. ज्यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मदत होईल. एमआयडीसी मधील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अमृत 2 या योजनेतून उपाययोजना करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे येथे आकारण्यात येणाऱ्या घरपट्टीत झालेली वाढ लक्षात घेता त्याबाबत आवश्यक निर्णय घेवून औद्योगिक क्षेत्रासाठी असणाऱ्या नियमानुसार त्यावर योग्य निर्णय महानगरपालिकेने घ्यावा. जकात नाक्याच्या बाजूला महानगरपालिकेची जागा असेल किंवा एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जागा असल्यास त्याठीकाणी येत्या पंधरा दिवसांत ट्रक टर्मिनलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना उद्योगमंत्री सामंत यांनी दिल्या आहेत.
अंबड औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र पोलीस स्थानकाची निर्मिती करणार : दादाजी भुसे
अंबड औद्योगिक क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी येथे लवकरच स्वतंत्र पोलीस स्थानकाची निर्मिती करण्यात येईल, असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, जिल्ह्यात शेतीला प्राधान्य असल्याने येथे कृषी प्रक्रीया उद्योग वाढीसाठी चांगली संधी आहे. कृषी पूरक व प्रक्रीया उद्योगांसोबतच शिक्षण, आरोग्य, आयटी यासारख्या क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतवणूक केल्यास जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. त्याचबरोबर येथे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात औद्योगिक हब, क्लस्टर निर्मितीसाठी पुरक वातावरण असल्याने येथे उद्योजकांना आवश्यक पाठबळ शासनाकडून देण्यात येईल. आयमा ने अंबड पुरते आपले कार्य मर्यादीत न ठेवता, जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करावे, अशी अपेक्षाही यावेळी पालकमंत्री भुसे यावेळी यांनी व्यक्त केली.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्री कॉरिडॉअर मध्ये नाशिक जिल्ह्याचा सहभाग करण्यात यावा. तसेच बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू होण्यासाठी शासन पातळीवर निर्णय होणे आवश्यक असून आयटी
उद्योजकांसाठी प्रोत्साहनपर योजना सुरू करण्यात यावी. त्याचप्रमाणे इलेक्ट्रीक मॅनीफ्रक्चरींग क्लस्टर उभारण्यात यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा) ने तयार केलेल्या डिरेक्टरीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारे उद्योजक यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. या बैठकीत आमदार सिमा हिरे यांनी औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी उद्योगमंत्री यांच्याकडे केली. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व उद्योजक संघटनाच्या प्रतिनिधींनी प्रतिनिधिक स्वरूपात येणाऱ्या अडीअडचणी उद्योगमंत्री यांच्या समोर मांडल्या.