कृषी विभागाची ‘कृषी यांत्रिकीकरण योजना’
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. कृषीविषयक यांत्रिकीकरणाची मदत ही या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. या योजनेसाठी सर्व खातेदार शेतकरी, शेतकरी गट / एफपीओ / सहकारी संस्था या पात्र लाभार्थी आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 7/12 व 8 अ, आधारकार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची प्रत व संवर्ग प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.
कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र व औजारे, ट्रॅक्टर व पावर टिलर चलित यंत्र व औजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित औजारे, प्रक्रिया युनिटस मिळणार असून भाडे तत्वावर कृषी यंत्र व औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी (औजारे बँक) यांचाही समावेश असणार आहे.
या योजनेत अनुदानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी व महिलांना ट्रॅक्टरसाठी 1.25 लाख व इतर बाबींसाठी 50 टक्के औजारे अशी मदत मिळणार आहे. इतर लाभार्थ्यांना ट्रॅक्टरसाठी 1 लाख तर इतर औजारांसाठी 40 टक्के किंवा मंजूर कमाल अनुदान मर्यादा यापैकी कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे.