प्रतापगडानंतर संग्रामदुर्ग किल्ल्यावरचं अतिक्रमणही हटलं
चाकण । सह्याद्री लाइव्ह । महाराष्ट्राची ऐतिहासिक संपदा असेलेल्या गड किल्यांवर अतिक्रमणाचं प्रमाण वाढलं आहे. या अतिक्रमणांवर कारवाईचे सत्र सध्या सुरु आहे. प्रतापगडावरच्या अफजल खानच्या कबरीजवळचं अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. चाकणजवळच्या संग्रामदुर्ग किल्ल्यावरचं अतिक्रमणही हटवण्यात आलं आहे. पोलिसांच्या मदतीने पुरातत्व विभागाने हे बांधकाम हटवलं आहे.
चाकणजवळ हा संग्रामदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्यावरचं बांधकाम हटवण्यासाठी पुरातत्व विभागाकडून चार वेळा नोटीस देऊनही बांधकाम हटवलं जात नव्हतं. बुधवारी अखेर पोलिसांच्या मदतीने पुरातत्व विभागाने हे अतिक्रमण हटवलं आहे.
या किल्ल्यावर पत्राशेड टाकल्यामुळे किल्ल्याच्या वास्तूला बाधा पोहचवली जात होती. किल्ले संरक्षणासाठी काम करणाऱ्या काही संघटनांनी याविषयी तक्रार दिली होती. त्यानंतर पुरातत्व विभागाने ही कारवाई केली आहे.