मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई, दि. 17 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत तीन शासकीय वसतिगृह, वरळी येथे कार्यरत आहेत. या वसतिगृहातील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन मुंबई शहरचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी, बी.डी.डी.चाळ-118, वरळी, मुंबई-18 या वसतिगृहाकरिता एकूण 95 जागा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी, बी.डी.डी.चाळ-116, वरळी, मुंबई-18 या वसतिगृहाकरिता 33 जागा, संत मिराबाई मुलींची शासकीय वसतिगृह, वरळी, बी.डी.डी.चाळ-116, वरळी, मुंबई-18 करिता एकूण ८१ जागा आहेत.
ज्या प्रवर्गासाठी जागा रिक्त आहेत अशाच प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात वसतिगृहातून विनामुल्य प्रवेश अर्ज प्राप्त करुन घेऊन परिपूर्ण अर्ज भरुन वसतिगृहात जमा करणे आवश्यक आहे. वसतिगृह प्रवेश अर्ज तिन्ही वसतिगृहांमध्ये तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर कार्यालय, चेंबूर, मुंबई येथे विनामूल्य उपलब्ध आहेत.
शासकीय वसतिगृहाचे सन 2021-22 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या व बी.ए. / बी. कॉम./बी.एससी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवी आणि एमए/एम.कॉम/एम.एस.सी.असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रमाकरिता (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021 इतका आहे.
24 डिसेंबर 2021 रोजी पहिली निवड यादी अंतिम करुन प्रसिद्ध करण्यात येईल, पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021 पर्यंत आहे. रिक्त जागेवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 05 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. 13 जानेवारी 2022 रोजी दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास 20 जानेवारी 2022 रोजी स्पॉट ॲडमिशन देण्यात येईल.
व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 4 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 असा आहे. 06 जानेवारी 2022 रोजी पहिली निवड यादी अंतिम करुन प्रसिद्ध करण्यात येईल, पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 12 जानेवारी 2022 पर्यंत आहेत. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 20 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना 25 जानेवारी 2022 रोजी प्रवेश देण्यात येईल. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहिल्यास 01 फेब्रुवारी 2022 रोजी स्पॉट ॲडमिशन देण्यात येईल.
पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतिगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास दिलेल्या मुदतीपर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य देऊन त्यास तत्काळ त्याच दिवशी वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल.अधिक माहितीसाठी गृहपाल संजय कदम (भ्रमणध्वनी क्र.8830316553) व श्री.जामनेकर (भ्रमणध्वनी क्र.8652717887) यांना संपर्क साधावा.
सामाजिक न्याय विभागाच्या या कल्याणकारी योजनेचा लाभ वंचित घटकांनी घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.