31 डिसेंबरसाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त
- चौकाचौकांत वाहनचालकांची होणार तपासणी - जमावबंदी आदेशामुळे गर्दी टाळण्यासाठी नियोजन
पुणे : 2021 ला निरोप देताना 2022 या नववर्षाच्या स्वागताला यंदाही करोनामुळे निर्बंध आले आहेत. शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करावे. नागरिकांनी घरी बसूनच नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरात गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक झोनकडून त्यांच्या हद्दीतील बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पाच झोनला सव्वातीनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त बंदोबस्त देण्यात आला आहे.
यावर्षी पुणे पोलिसांचा सर्वांत मोठा बंदोबस्त हा कोरेगाव भीमा परिसरात राहणार आहे. त्यामुळे सर्व झोनच्या पोलीस उपायुक्तांना त्यांच्या हद्दीत बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी गर्दी होणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अतिरिक्त बंदोबस्त दिला जाणार आहे. सर्व झोनला नववर्षाच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त दोन सहायक पोलीस आयुक्त.
एक पोलीस निरीक्षक, 28 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि 281 कर्मचारी देण्यात आले आहेत.
वाहतूक शाखेचा वेगळा बंदोबस्त राहणार असून, 31 डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. चौका-चौकांत मद्यपान केलेल्या वाहनचालकांची तपासणी केली जाईल.
शहरात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध हॉटेल, खासगी रिसोर्टमध्ये अनेकांनी पार्ट्यांचे नियोजन केले होते. मात्र, दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाने रात्री नऊ ते सकाळी सहा यादरम्यान जमावबंदी लागू केली आहे. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तरुणाईकडून नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी फर्गसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, एम. जी. रस्ता, कोरेगाव पार्क, विमाननगरमध्ये गर्दी केली जाते. पण, यावर्षी जमावबंदी असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी बंदोबस्त लावण्यात आला आहे