अभिनेत्री आयेशा झुल्का लोणावळा शहर स्वच्छतेच्या “ब्रॅंड ऍम्बेसिडर’
लोणावळा – स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये संपूर्ण देशात द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या पर्यटननगरी लोणावळा शहराच्या स्वच्छतेच्या “ब्रॅंड ऍम्बेसिडर’ म्हणून बॉलिवूड अभिनेत्री आयेशा झुल्का यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी तसे पत्र नुकतेच आयेशा झुल्का यांना दिले आहे.
आयेशा झुल्का यांचे लोणावळा शहरात संकेण्ड होम असून, त्यांनी शहरात सामाजिक कार्यात सहभाग नोंदवीत काही अभिनव उपक्रम राबविले आहे. यात प्रामुख्याने शहरातील सर्व भागात आयेशा फाउंडेशनमार्फत नगरपरिषदेच्या सहकार्याने शहरातील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांसाठी “डॉगफिडर’ बसवण्याची संकल्पना राबवली. या “डॉगफिडर’मध्ये दैनंदिन अन्न व पाणी पोहचविण्याचे काम आयशा फाउंडेशनमार्फत केले जाते. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.
भारत सरकारने घोषीत केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबविणेत येत आहे. या अनुषंगाने नगरपरिषद राबवित असलेल्या स्वच्छतेच्या उपक्रमांची माहिती जनतेला व्हावी तसेच यात जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होण्याकरीता लोणावळा शहराचे स्वच्छतेचे “ब्रॅंड ऍम्बेसिडर’ म्हणून आयेशा झुल्का यांनी काम करावे, अशी विनंती लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली होती. ही विनंती स्वीकारताना आयेशा झुल्का यांनी आपल्यासाठी ही गर्वाची बाब असल्याचे सांगत शहर स्वच्छतेबाबत लोणावळा नगरपरिषदेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.