प्रशासकीय कामकाजात लेखा व आस्थापना शाखेचे कामकाज अत्यंत महत्त्वपूर्ण – लेखा उपसंचालक रवींद्र साळुंके
पुणे : प्रशासकीय कामकाजात लेखा व आस्थापना शाखेचे कामकाज अत्यंत महत्वपूर्ण असल्याने लेखा व आस्थापना विषयक कामकाजात तत्परता व अचूकता महत्वाची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनंसपर्क विभागाचे लेखा उपसंचालक रवींद्र साळुंके यांनी आज येथे केले.
पुणे विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने लेखा विषयक कार्यशाळेचे येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी साळुंके बोलत होते. कार्यक्रमाला विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) डॉ. राजू पाटोदकर, पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, सोलापूरचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, सातारा जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, माहिती अधिकारी सचिन गाढवे आदी उपस्थित होते.
उपसंचालक साळुंके म्हणाले, लेखा व आस्थापना कामकाज करताना वेळोवळी नोंदी, प्रलंबित परिच्छेदाचा गतीने निपटारा, रोख नोंदवही, कार्यालयातील नोंदवह्या, सेवापुस्तक अद्ययावत असणे गरजेचे आहे. कार्यालय प्रमुखांनी वेळोवळी रोख नोंदवही व कार्यालयातील इतर नोंदवह्यांची तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध नियमावली, शासन निर्णय आणि नियमांचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसनही साळुंके यांनी केले.
उपसंचालक डॉ. पाटोदकर म्हणाले, लेखा व आस्थापना विषयक कामकाजात अचूकता येण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा प्रधान सचिव दीपक कपूर यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणात लेखा व आस्थापनाविषयक बाबींसंदर्भात मार्गदर्शन होईल आणि कामकाज सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय खरेदीप्रक्रियेसाठी खरेदी धोरण अभ्यासावे– रमेश कुलगोड
माजी मुख्य लेखा व वित्त अधिकारी रमेश कुलगोड यांनी दुसऱ्या सत्रात ऑनलाईन खरेदी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाचे खरेदी धोरणाचा चांगला अभ्यास करणे महत्वाचे आहे. खरेदी प्रक्रियेत वेळोवेळी येणाऱ्या शासन निर्णयांची माहिती गरजेचे असल्याचे ते म्हणाले. ऑनलाईन खरेदी प्रक्रिया कशी राबवावी, जेम पोर्टलवरून खरेदी, लेखा आक्षेपांचा निपटारा करणे, वित्तीय अधिकार, वित्तीय अधिकार मर्यादा, आयकर विषयक बाबी, देयके सादर करताना घ्यावयाची काळजी याबाबतही त्यांनी माहिती दिली. प्रशिक्षणार्थींना कुलगोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षणाला पुणे, सोलापूर व सातारा जिल्हयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.