Accident : चाकण-शिक्रापूर रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी
चाकण । सह्याद्री लाइव्ह । चाकण-शिक्रापूर रस्त्यावर समोरुन भरधाव वेगाने आलेल्या मोटारीची धडक बसल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे. शेलपिंपळगाव येथे रसिका हॉटेलजवळ शुक्रवारी (दि. १७) पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली.
विशाल मंगेश सावके (वय २२) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र गौरव हेमंत सारसकर (वय २५) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी गौरव सारसकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर मार्गावर शेलपिंपळगाव येथे शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास फिर्यादी गौरव सारसकर आणि त्याचा मित्र विशाल सावके हे दोघे दुचाकीवरून चाकण-शिक्रापूर रस्त्यावरुन जात होते. त्यांची दुचाकी शेलपिंपळगाव येथील रसिका हॉटेलजवळ आली तेव्हा समोरुन येणा-या एका भरधाव मोटारीची दुचाकीला धडक बसली. या धडकेत विशाल सावके याचा मृत्यू झाला. तर फिर्यादी गौरव याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर मोटारीचा चालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाला आहे.
या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेंडकर तपास करीत आहेत.