राज्यातील 67 टक्के वनक्षेत्र होणार वातावरण बदलामुळे प्रभावित
भारतीय वनसर्वेक्षण संस्थेच्या अहवालात खुलासा; देशातील प्रभावित वनांचे "हॉस्टस्पॉट' अधोरेखित
पुणे : जागतिक वातावरण बदलाचे परिणाम आता भारतीय उपखंडात दिसण्यास सुरवात झाली असून, येत्या आठ वर्षात म्हणजेच 2030 सालापर्यंत राज्यातील 67 टक्के वनक्षेत्रावर वातावरण बदलाचे गंभीर परिणाम होईल, असा इशारा एका अहवालातून देण्यात आला आहे. याचबरोबर त्यामुळे वातावरण बदल आणि त्याच्या परिणामांचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिक सविस्तर अभ्यास करण्याची या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय वनसर्वेक्षण संस्थेतर्फे नुकताच “वनांची सद्यस्थिती -2021′ हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालांतर्गत हवामान बदलाच्या अनुषंगाने सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या वनक्षेत्रांचे हॉटस्पॉट अधोरेखित करण्यात आले आहे. भारतीय वनसर्वेक्षण संस्था आणि गोवा येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍण्ड सायन्स, पिलानी या संस्थांनी हा अभ्यास केला असून, यासाठी संगणकीय मॉडेलचा आधार घेण्यात आला आहे. या अभ्यासाच्या आधारावर 2030 सालापर्यंत देशातील 45 ते 65 टक्के वनक्षेत्र हे वातावरणामुळे प्रभावित होणार असून, लडाख प्रदेशातील वनक्षेत्रास त्याचा सर्वाधिक धोका असेल, असा अंदाज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील तब्बल 67 टक्के वनक्षेत्रावर “उच्च’ प्रभाव होईल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, भारतात प्रत्येक शतकात तापमानात किंचित वाढ होत आहे. परिणामी भारताच्या हरित संपदेवर त्याचा लक्षणीय परिणाम होत असून, सिक्कीम सारख्या प्रदेशात हरित आच्छादनाच्या प्रकारात काही अंशी बदल होत असल्याची नोंद अभ्यासकांनी घेतली आहे. देशाच्या इतर भागातही असा बदल होत आहे का? याबाबतचा अभ्यास करण्यासाठी हे हॉटस्पॉट अधोरेखित करण्यात आले असल्याची माहिती भारतील वनसर्वेक्षण संस्थेतर्फे देण्यात आली आहे.
काय असतील परिणाम ?
या अभ्यासानुसार, वातावरण बदलामुळे लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तापमानात सर्वाधिक वाढ होण्याचा अंदाज आहे, तर अंदमान आणि निकोबार बेटे, पश्चिम बंगाल, गोवा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये सर्वात कमी तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे. ईशान्येकडील राज्यात सर्वाधिक पाऊस पडेल, तर देशाच्या उत्तर-पश्चिम भागांमध्ये पावसात किमान वाढ आणि काहीवेळा घट होण्याचा अंदाज आहे. हवामान बदलाचा जंगलांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा अनेक प्रकारे परिणाम होईल. प्रामुख्याने काही वनस्पती अथवा प्राणी प्रजाती नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषत: पर्वत माथ्यावर याचे गंभीर परिणाम होतील. त्याचबरोबर हरित आछादनात घट झाल्यास कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढून परिणामी तापमानात आणखी वाढ होण्याचा धोका. मानवी आरोग्यावरही त्याचे प्रतिकूल परिणाम होण्याची भिती.
- राज्यातील एकूण वनक्षेत्र – 55778
- वातवरण बदलाने प्रभावित होणारे वनक्षेत्र – 33170
- प्रभावित वनक्षेत्राचे प्रमाण – 67.29 टक्के
1 Comment
[…] More माघवारी पंढरपूर, जया एकादशी राज्यातील 67 टक्के वनक्षेत्र होणार वात… […]