विविध उपक्रमांतून सुमारे दोन कोटी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणार – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर
अमरावती : महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात व त्यांच्यात उद्योजकतेचा विकास व्हावा, यासाठी महाविकास आघाडी शासनाने विविध योजना व उपक्रम अंमलात आणल्या आहेत. ‘माविम’ व इतर उपक्रमांच्या माध्यमातून त्यामुळे येत्या काळात राज्यातील सुमारे दोन कोटी महिलाभगिनींचे आर्थिक सक्षमीकरण होईल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज वलगाव येथे व्यक्त केला.
उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान व स्वशक्ती महिला प्रभाग संघातर्फे महिला मेळावा वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार संतोष काकडे, सरपंच मोहिनी मोहोड, प्रेमकिशोर सिकची, उमेदचे सचिन देशमुख, सुचिता पाटील, इब्राहिम पठाण, माधुरी भाले, नितीन शिरभाते, तसेच अनेक स्वयंसहायता समूहांच्या महिला सदस्य आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, सक्षम महिला कुटुंबाला व समाजालाही प्रगतीकडे नेते. जग बदलण्याची ताकद महिलांमध्ये आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सक्षमीकरण झाले पाहिजे. त्यासाठी महिलाभगिनींनी समकालीन घडामोडींबद्दल जागृत असले पाहिजे. आपल्या हक्कांप्रती जागरूकता व भान जागवणेही आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.
महाविकास आघाडी शासनातर्फे 2 कोटी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना व उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, बचत गटामधील महिलांमध्ये उद्योजकतेचा विकास व्हावा, यासाठी माविम अनेक योजना राबवित आहे. त्याचप्रमाणे, जिल्हा बँकेतर्फेही जिल्ह्यात सुमारे 100 कोटी रूपये निधीतून बचत गटांना पतपुरवठ्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘उमेद’चे सचिन देशमुख म्हणाले की, उमेदतर्फे 18 हजार 596 स्वयंसमूहता संघ, पाच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापित असून, 59 क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने ‘मेळघाट हाट’ उपक्रम आकारास येत आहे. बचत गटांना आपल्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ त्याद्वारे मिळणार आहे. प्रभाग संघांनी आपल्या वाटचालीचे पुनरावलोकन करून पुढील काळासाठी भरीव नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी पालकमंत्र्यांनी मेळाव्यात सहभागी गटांच्या स्टॉलला भेट देऊन सदस्यांशी संवाद साधला व विविध उत्पादनांची माहिती घेतली.