धाकट्या बहिणीच्या लग्नाला ‘खोडा’ घालणा-या युवकाला कोयत्याने वार करून संपविले
खेड तालुक्यातील वाफगावनजीक मांदळेवाडी गावातमध्ये धक्कादायक घटना; अवघ्या दोन तासांत खुनीला बेड्या, खुनाचीही दिली कबुली
खेड (जि. पुणे) । सह्याद्री लाइव्ह । धाकट्या बहिणीच्या लग्नाला ‘खोडा’ घालणा-या २४ वर्षीय युवकाचा थोरल्या भावाने कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केला. खेड (जि. पुणे) तालुक्याच्या पूर्व भागातील वाफगावच्या मांदळेवाडी गावात शुक्रवारी (दि. ४ नोव्हेंबर) दुपारी दीडच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी खेड पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीचा सुगावा लावला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अक्षय रोहिदास मांदळे (वय 24, रा. मांदळेवाडी, वाफगाव, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी अभिजीत मच्छिंद्र मांदळे (वय २२, रा. मांदळेवाडी, वाफगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अक्षय मांदळे याची आई विमल रोहिदास मांदळे (वय ४२) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजीत मांदळे याच्या बहिणीचे लग्न ठरले होते. बहिणीला पाहण्यासाठी पाहुणेही येणारही होते. परंतु अक्षय अक्षय मांदळे हा वारवांर खोडा घालत होता. हा सततचा त्रास आणि आरोपीच्या बहिणीला ‘माझ्याशी लग्न कर’, असे म्हणत होता. याचा राग अभिजीत मांदळे याच्या मनात होता. या कारणावरून शुक्रवारी (दि. ४) दुपारी दीडच्या सुमारास अभिजीत मांदळे हा अक्षय काम करीत असलेल्या सचिन भगवंत मोरवे यांचे मक्याचे शेतात गेला.
अभिजीतने अक्षयला समजावून सांगितले. मात्र अक्षय काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. शेतात दोघांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये अभिजीत याने अक्षय याच्यावर लोखंडी कोयत्याने डोक्यात, गळ्यावर, खांद्यावर, डाव्या हातावर तसेच दोन्ही हाताच्या पंजावर सपासप वार केले. या हल्ल्यात अक्षयचा मृत्यू झाला.
माहिती मिळताच खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, खेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार बाळकृष्ण साबळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ताब्यात घेताच आरोपी अभिजीत मांदळे याने खुनाची कबुली दिली.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयसिंह चौहान तपास करीत आहेत.
अवघ्या दोन तासांत आरोपी जेरबंद
खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांच्या सूचनेनुसार खेड पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील (डी.बी.) पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सहायक फौजदार भवारी, सहायक फौजदार कड, पोलीस हवालदार साबळे, पोलीस नाईक जतकर, पोलीस नाईक प्रवीण गेंगजे, पोलीस अंमलदार सोनुने, पोलीस अंमलदार लोहार, पोलीस नाईक करंडे यांच्या पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला माग घेतला आणि अवघ्या दोन तासांत खुन्याला जेरबंद करण्यात यश आले.