गावातला ओळखीचा तरूण शहरात आला अन् महिलेला छळू लागला…
विनयभंगप्रकरणी ३३ वर्षीय तरुणाला अटक; भांबोली परिसरात दोन दुचाकींची तोडफोड
महाळुंगे (चाकण) । सह्याद्री लाइव्ह । करोना महामारीमुळे गावाहून म्हाळुंगे परिसरात राहण्यासाठी आलेल्या तरुणाने लॉकडाऊन काळात ओळखीतून एका महिलेला त्रास दिला. वेळोवेळी पाठलाग करून तरुणाने मोबाईलवरून धमकी दिली. तसेच महिलेसह पती यांच्या पार्किंगमधील वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
या प्रकरणी 28 वर्षीय महिलेने महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून सुजीत स्वाईन (वय ३३, रा. वराळे, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भांबोलीतील वासोली फाटा परिसरात वास्तव्यास आहेत. करोन महामारीच्या काळात सन २०२० मध्ये ‘लॉकडाऊन’मध्ये फिर्यादी यांचे गावाचे शेजारी राहणारे सुजित स्वाईन हा आरोपी वराळे (ता. खेड) येथे राहण्यास आला होता. सुजीत हा गावाकडील असल्यामुळे फिर्यादी त्याचेबरोबर मोबाईलवर बोलत होत असे. याशिवाय सुजीत फिर्यादींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होते. सुजीत फिर्यादींकडे वाईट नजरेने पहात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर फिर्यादींनी सुजीतशी बोलणे टाळले. मोबाईलवर सुजीतचा नंबर ब्लॉक केला. याबाबत फिर्यादींच्या पतीलाही सुजीत याने धमकी दिली.
सध्या फिर्यादी या भांबोली परिसरात राहतात. त्याठिकाणी २९ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास सुजीत आला. त्याने फिर्यादी दोन दुचाकींची तोडफोड करून नुकसान केले. हा सारा प्रकार फिर्यादींच्या पतीने पाहिले. वारंवार पाठलाग करून त्यांना व त्यांचे पती यांना मोबाईलवरून धमकी दिली. तसेच दुचाकींचे नुकसान केले.
या प्रकरणी महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक संगीता भंडरवाड तपास करीत आहेत.