लोणावळा, खंडाळ्यासह मावळ तालुक्यातील साहसी पर्यटनासाठी एक पाऊल!
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार सुनील शेळके यांच्याकडून पर्यटनस्थळांची पाहणी
मावळ – मावळ तालुक्यातील पर्यटकांसाठी निसर्ग पर्यटनासोबतच झीप लाईन, व्हॅली क्रॉसिंग, रोप वे असे साहसी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यादृष्टिने एक पाऊल पडले आहे. आमदार सुनील शेळके यांच्या समवेत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व पुणे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी मावळातील लोणावळा व परिसरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर भेटी देत पाहणी केली. यावेळी राजमाची गार्डन, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट आदी ठिकाणांवर जाऊन पर्यटनस्थळांवरील स्थानिक समस्यांबरोबरच येथील सोयी-सुविधांचा देखील त्यांनी आढावा घेतला.
निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेल्या मावळ तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार संधी निर्माण होत आहे. मावळ तालुक्याची ओळख पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. तालुक्यातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करू लागले आहे. यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी स्थानिकांना निर्माण होऊ लागल्या आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा, मनोरंजन, विरंगुळा यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे गरजेचे आहे. यादृष्टीने मावळातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते.
मावळात येणाऱ्या पर्यटकांचा अधिकाधिक वेळ पर्यटन स्थळांवर व्यतीत व्हावा व याचा फायदा पर्यटनावर आधारित असणाऱ्या छोट्या स्थानिक व्यावसायिकांना व्हावा. पर्यटकांसाठी निसर्ग पर्यटनासोबतच झीप लाईन, व्हॅली क्रॉसिंग, रोप वे असे साहसी प्रकल्प राबविण्यात यावे. राज्य सरकारने राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता दिली आहे. या साहसी पर्यटन धोरणाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे आमदार शेळके यावेळी म्हणाले.
पर्यटन स्थळांचा विकास करत असताना वनविभागाचे सहकार्य गरजेचे आहे. वनविभागाच्या हद्दीतील काही ठिकाणी नियम, परवानग्या यामुळे असे प्रकल्प राबविताना अडचणी येतात. त्यासाठी अधिकाऱ्यांनी या प्रक्रिया सुलभ करून सहकार्य करणे अपेक्षित आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीने मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीने स्थानिक विकास होणे गरजेचे आहे. तसेच पर्यटनस्थळांजवळ वाहनतळासाठी जागा उपलब्ध झाल्यास सुट्ट्यांच्या काळात पर्यटन स्थळांच्या ठिकाणी व परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही.
यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, सुशील मंतावार, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड, अनिल मालपोटे, मयूर झोडगे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
…असा आहे पर्यटन स्थळाचा प्रस्ताव
पर्यटकांना रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे, वाहनतळ यांसारख्या मूलभूत सुविधांसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. ही पर्यटनस्थळे आता फक्त “सेल्फी पॉइंट’साठी न राहता याठिकाणी “वॉटर लाईट शो’, लहान मुलांसाठी खेळणी, म्युझिकल रेन डान्स आदी प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. भविष्यातील पर्यटन विचारात घेता असे विविध प्रकल्प याठिकाणी राबवावे लागतील. पर्यटन वाढ झाल्यास त्याचा फायदा स्थानिक छोटे-मोठे व्यावसायिक, टपरीधारक, हॉटेल्स यांना नक्कीच होईल. असा पर्यटन स्थळांच्या विकासाचा प्रस्ताव आमदार शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडला.
मावळ तालुक्यातील पर्यटनासंदर्भात लवकरच योग्य मार्ग काढून विकासकामांची सुरुवात करण्यात येईल. पर्यटन वाढीच्या दृष्टीने योग्य पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी नक्कीच सहकार्य केले जाईल.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे