चाकण औद्योगिक हप्त्यासाठी रिक्षाचालकाच्या गळ्याला लावला कोयता…
तू जर हप्ता चालू केला नाही, तर तुला जिवंत सोडणार नाही... चाकण ‘एमआयडीसी’मध्ये हप्ता वसुली जोरात
चाकण । सह्याद्री लाइव्ह। चाकण औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) परिसरात गुंड प्रवृत्तीने हैदोस घातला आहे. ‘एमआयडीसी’मध्ये रिक्षाचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी दरमहा हप्त्याची मागणी केली. मात्र हप्ता देण्यास नकार दिल्याने तिघांनी रिक्षा व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. त्याच्या खिशातील रोकडही आरोपींनी लांबविली. कोयता गळ्याला लावून तुझा गेम करतो, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी सूरज गणपत कदम (वय २९, रा. जावळे वस्ती, महाळुंगे इंगळे, ता. खेड, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूरज कदम यांच्या फिर्यादीवरून योगेश विलास बोत्रे (रा. खालुंब्रे, ता. खेड), राहुल बाळासाहेब फलके (रा. महाळुंगे ता. खेड) आणि योगेश बोत्रे याचा एक मित्र अशा तिघांवर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूरज कदम यांच्या तीन रिक्षा असून, ते रिक्षाचा व्यवसाय करतात. एमआयडीसी परिसरात रिक्षाचा व्यावसाय सुरू ठेवण्यासाठी योगेश बोत्रे, राहुल बोत्रे व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादी सूरज यांच्याकडे दरमहा १५ हजार रुपये हप्त्यासाठी मागणी केली. फिर्यादीने हप्ता देण्यास नकार दिल्याचे कारणावरून चिडून आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी तोंडावर, पोटात, पाठिवर मारहाण करून दुखापत केली. तसेच योगेश बोत्रे याने फिर्यादीच्या शर्टच्या खिशातून दोन हजार रुपयांची रोकड काढून घेतली. एकाने गाडीमध्ये डायव्हिंग सीटवर बसून फिर्यादीस लोखंडी कोयता दाखवून, तुला माज आला आहे, तुझी गेम करायला आम्हाला वेळ लागणार नाही, असे बोलून, मारा, हरामखोराला आपल्याला नाही बोलतो काय ? त्याला धडा शिकवा, असे आरोपींनी ओरडून सांगितले.
या मारहाणीत फिर्यादीचे तोंडातून रक्त आल्याचे दिसून आल्यावर सर्व आरोपी हे त्यांचे मोटारीतून जात असताना आरोपी योगेश बोत्रे याने फिर्यादीस ‘तू जर हप्ता चालू केला नाही, तर तुला जिवंत सोडणार नाही, तुझी गेम करतो’, अशी धमकी दिली.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील तपास करीत आहेत.