महिला सक्षमीकरणासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासासमवेत पायलट प्रोजेक्ट राबवणार – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
मुंबई : महिलांच्या विकासासाठी, सक्षमीकरणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबविते. या उपक्रमांना गती देण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या योजनांबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासासमवेत पायलट प्रोजेक्ट राबवणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महिला सक्षमीकरणासाठी राबविण्याच्या योजनांबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावास आणि महिला व बाल विकास विभागातील अधिकारी यांच्या समवेत आज बैठक झाली.
या बैठकीत नागरी भागातील अंगणवाड्यांचे सक्षमीकरण, बालकांची काळजी घेण्याऱ्या संस्थांना मदत, सामाजिक दायित्व निधीतून देण्यात येणारी मदत, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटातील महिलांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, अनाथ बालकांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत याबाबत परस्पर सहकार्य करण्याबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावास यांच्या समवेत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त राहुल महिवाल, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी, उपसचिव विलास ठाकूर, तसनिम वाहनवटी आदि उपस्थित होते.
मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, महिला व बाल विकास विभागाने प्रतिपालकत्व नोंदणी पोर्टल सुरू केले आहे, हे निश्चितच एक महत्त्वाचे पाऊल असून त्यामुळे काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी मदत होणार आहे. महिलांमध्ये उद्योजकीय विकास, रोजगाराच्या संधी, बचतगटाच्या उत्पादनांना बाजारपेठ यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ काम करते. बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ई-बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे बाजारपेठेतील संबंध विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बचतगटाच्या महिलांना कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य आपल्याला घेता येईल.
नकळत वाट चुकून गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या बालकांचे संनियंत्रण व त्यांची देखरेख करणे सोपे व्हावे यासाठी ‘ज्युवेनाईल जस्टीस इन्फर्मेशन सिस्टीम’ ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असल्याची माहिती यावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांनी दिली. नागरी भागात कुपोषित मुले आढळून आली आहेत यासाठी ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी भागात नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. राज्यातील निराधार, निराश्रित, अनाथ, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला तसेच अनाथ आणि काळजी संरक्षणाची गरज असलेली बालके, स्तनदा माता, किशोरवयीन मुले या सर्व घटकांची विशेष काळजी राज्य शासनाच्यावतीने घेतली जाते, असेही मंत्री ॲड.ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
कॉन्सुलेट जनरल मायकल ब्राऊन म्हणाले, महिला सक्षमीकरणाच्या योजनांसाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळेल. याबाबत आपण मसुदा तयार करून परपस्पर सहकार्याने काम करू.