फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारावे – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबई | सह्याद्री लाइव्ह | स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीश पहारेकऱ्यांना चुकवून फ्रान्सच्या समुद्रात मार्सेलिस बंदराजवळ “मोरिया” या बोटीवरून ८ जुलै, १९१० रोजी मारलेली उडी त्रिखंडात गाजली. हा दिवस “साहस दिन” म्हणून साजरा केला जातो. याची आठवण म्हणून फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जावे यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्मारक उभारणीची संकल्पना असून विधानसभा अध्यक्ष यांच्या दिल्ली दौऱ्यात याबाबत पुढील कार्यवाहीच्यादृष्टीने केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या समवेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या ऐतिहासिक उडीला ८ जुलै, २०२२ रोजी ११२ वर्षे पूर्ण झाली. ते औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते झाले होते. याप्रसंगी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी या प्रेरणादायी कृतीचे भावी पिढ्यांना चिरस्मरण व्हावे यादृष्टीने फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक व्हावे आणि त्यासाठी विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी यासंदर्भात पाठपुरावा करू, असे सांगितले होते.