किरकोळ वादातून शेतक-यावर कोयत्याने वार; शेतकरी गंभीर जखमी
म्हाळुंगे । सह्याद्री लाइव्ह । शेताच्या बांधावर दारूच्या बाटल्या टाकण्यावरून झालेल्या वादात एका शेतक-याच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची घटना सांगुर्डी येथे घडली आहे.
चंद्रकांत मारूती भसे (वय ५५ रा. सांगुर्डी) असे जखमी झालेल्या शेतक-याचे नाव आहे. या प्रकरणी चेतन सुनिल भसे (वय २२), अनिल लक्ष्मण भसे (वय ४६), अजित हिरामण भसे (वय ३० तिघेही राहणार सांगुर्डी) यांच्याविरोधात म्हाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शेताच्या बांधावर झाला वाद
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी शेळ्यांसाठी शेतातील गवत कापण्यासाठी गेले असताना त्यांच्या शेताच्या बांधावर दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसल्या. बाटल्या आणि काचा कोणी टाकल्या अशी विचारणा चंद्रकांत भसे यांनी केली. त्यावेळी अजित भसे आणि अनिल भसे या दोघांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी जवळच पडलेले लाकूड आणि कौल हातात घेवून चंद्रकांत भसे यांच्या अंगावर धावून गेले. चेतन भसे याने चंद्रकांत यांना ढकलून देत त्यांच्या हातातला कोयता हिसकावून घेतला आणि त्याच्या डोक्यात दोन वार केले. यामध्ये फिर्यादी चंद्रकांत भसे गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी म्हाळुंगे पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक भंडारवाड तपास करत आहेत.
सविस्तर बातम्या पाहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES