माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाकडून जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्मितीसाठी दीड कोटीचा धनादेश सुपूर्त
डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते बाळासाहेब काशिद यांच्याकडे चेक सुपूर्त
पुणे ।सह्याद्री लाइव्ह। “आपले हात हे घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी सुध्दा असतात. याच न्यायानुसार उदार अंतःकरणाने मदत करावी. भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणार्या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे सुवर्णजडित गाभारा मंदिराच्या निर्मितीनंतर संपूर्ण मानवजातीच्या उन्नतीसाठी व समाजाच्या सुसंस्कारासाठी उपयुक्त असेल.” असे विचार माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केले.
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्मितीसाठी माईर्स एमआयटी शिक्षण समूहाच्या वतीने डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते १,५०,००,००० (एक कोटी पन्नास लाख मात्र)चा चेक श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित कार्यक्रमात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रा. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू शिक्षणतज्ञ डॉ. एस. एन. पठाण, डॉ. संजय उपाध्ये, दामोदर शिंदे, माजी सरपंच इंदोरी, बबनराव ढोरे, अरविंद शेवकर, विष्णू खांदवे आणि इक्बालभाई शेख उपस्थित होते.
माईर्स एमआयटी शिक्षण समूह, पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, उज्जैनची एमआयटी अवंतिका युनिव्हर्सिटी आणि शिलॉग येथील एमआयटी यूटीएमच्या शैक्षणिक संस्थांचे ५४ हजार विद्यार्थी, २५०० शिक्षक व ३५०० शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हे मौलिक योगदान दिले आहे.
डॉ. कराड म्हणाले, “या सुवर्णजडित मंदिराच्या माध्यमातून भारताच्या वैभवात भर पडेल. अशा या पवित्र स्थळाचे पावित्र्य व त्याचा अद्भूत इतिहास आपण कर्तव्य भावनेतून जपून ठेवावा. पवित्र धर्म तीर्थक्षेत्रांचा ज्ञानतीर्थ क्षेत्र म्हणून विकास करून भंडारा डोंगराचे वैभवशाली स्वरूप जगासमोर विशेषतः युवा पिढीपुढे आणावा.”
बाळासाहेब काशिद म्हणाले,“भंडारा डोंगर येथे जवळपास १५० कोटी रूपये खर्च करून मंदिर निर्मितीचे कार्य सुरू आहे. एमआयटी संस्थेकडून मिळालेल्या या निधीचा खूप मोठा वाटा आहे. सृष्टीवरील प्रत्येक मानवाला शांतीची गरज आहे, पण ती त्याल मिळत नाही. परंतू संतांच्या या भूमित आम्हाला सदैव आनंद आणि शांती मिळते. या डोंगरावरूनच संपूर्ण जगात शांतीचा मंत्र दिला जात आहे.”
त्यानंतर डॉ. संजय उपाध्ये यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.
मंदिरासाठी मुस्लिम समाजाने सढळ हाताने मदत करावी – डॉ. पठाण
अखिल भारतीय मुस्लिम बुद्धिजीवी मंच व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण म्हणाले की, चारशे वर्षांपूर्वी दुभंगलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे महान कार्य जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांनी केले. ते एक महान समाजसुधारक होते. त्यांनी लिहिलेल्या अभंगानंतर मुस्लिम समाजातील बरेच लोक वारीला जावू लागते. मंदिर निर्मितीसाठी अखिल भारतीय मुस्लिम बुद्धिजीवी मंचच्या वतीने सव्वा लाख रूपये देणगी देण्यात आली. त्यानंतर डॉ. पठाण यांनी आवाहन केले की सर्व मुस्लिम समाजातील लोकांनी सढळ हाताने मदत करावी, असेही डॉ. पठाण यांनी स्पष्ट केले.