पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मोटारीला बोरघाटात भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील उतारावर कि.मी. 37 जवळ गुरुवारी (दि. १७) रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला; तीन जण जखमी झाले आहेत. एक महिला या अपघातात सुदैवाने वाचली आहे.
या अपघातात अब्दुल रहमान खान (वय 32, रा. घाटकोपर), अनिल सुनील सानप, वसीम साजिद काझी (रा. राजापूर, जि. रत्नागिरी), राहुल कुमार पांडे (वय 30, रा. कामोठे, नवी मुंबई), आशुतोष नवनाथ गाडेकर (वय 23 म्हातारपाडा, मुंबई) असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर मोटार चालक मच्छिंद्र आंबोरे (वय 38), अमीरउल्ला चौधरी, दीपक खैराल हे जखमी झाले असून, अस्फीया रईस चौधरी (वय 25, रा. कुर्ला, मुंबई) या सुखरुप बचावल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईकडे जाणारी एर्टीगा कार क्र. (M.H. 14 /E.C./3501) मध्ये चालकासह नऊ प्रवासी होते. सर्व प्रवासी हे वेगवेगळ्या ठिकाणहून मुंबईकडे जाण्यासाठी मोटरीमधून प्रवास करीत होते. ही मोटार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ढेकू गावचे हद्दीत किलोमीटर 37.00 येथे आली. त्यावेळी चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि मोटारची अज्ञात वाहनाला मागून धडक बसली.
मोटारीची धडक जबरदस्त होती की त्यामध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एक महिला किरकोळ जखमी झाली असून, चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यातील एक जणांचा मृत्यू झाला आहे.
चालक आणि अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. रात्री 11 वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान हा अपघात झाला. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, लोकमान्य रुग्णालय आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी यावेळी मदत कार्य केले.
हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला असून, अपघात स्थळी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले आदींच्या पथकाने भेटी देत या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.