भाजप सोबत सरकार कोणी स्थापन करायचे याची चढाओढ
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ‘आघाडी’वर टीका
पुणे : सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षांमध्ये आघाडीतून आधी कोण बाहेर पडायचे आणि भारतीय जनता पार्टीसोबत सरकार कोणी स्थापन करायचे याची चढाओढ सुरू झाली आहे. मागील दोन वर्षांत आघाडीतील घटकपक्षांनी सामान्यांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलेला त्रास लक्षात घेऊन, पक्षाचे कार्यकर्ते कोणत्याही घटक पक्षासोबत जाण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि. ३०) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. तब्बल पाच दिवसांच्या अधिवेशनामध्ये समाजातील कुठल्याही घटकाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. केवळ 32 कोटींच्या पुरवण्या मान्य करणे आणि विद्यापीठ कायद्यासारखी स्वत:च्या फायद्याची 19 विधयेक मंजूर करून घेण्यात आली. विधानसभा अध्यक्ष निवडीचा प्लॅन त्यांचा अपयशी ठरला. भाजपा कार्यकर्त्यांना त्रास देणे,
त्यांना विविध गुन्ह्यात अडकविणे आणि भाजपा आमदारांना विकासासाठी निधी नाकारण्याचा इतिहास या सरकारचा आहे. तो पाहता यांच्यापैकी कोणासोबत जाण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही. अर्थात याविषयीचा निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व घेईल. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला.
त्यावेळी आघाडी सरकारचे तोंड फुटले. आता, दादागिरी करून आमदार नितेश राणेंच्या बाबतीत दुसरा प्रयत्न चालू आहे. पण, हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. राणे त्यांना पुरून उरतील. ओबीसी आरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा विधिमंडळात ठराव झाला असला तरी त्यामागे सरकारची ओबीसी आरक्षणापेक्षा स्वतःच्या नेतृत्वाची काळजी आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम करण्याची भूमिका पाहता या ठरावाचा किती परिणाम होईल याची शंका आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत येण्याची ऑफर दिली होती, या शरद पवार यांच्या व्यक्तव्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मोदीजींनी ऑफर दिली होती हे सांगायला शरद पवार यांना इतका वेळ का लागला, असा प्रश्न उपस्थित केला. अशी ऑफर मिळाली असती तर ती नाकारण्याइतका राजकीय असमंजसपणा पवारांचा नाही. पण त्यांचा इतिहास खरे बोलण्याचा नाही. त्या दोघांमध्ये काय बोलणे झाले, ते त्यांनाच माहित आणि त्याविषयी मी भाष्य करणे योग्य नाही.