तुळजापूरच्या औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करणार – राज्य मंत्री आदिती तटकरे
उस्मानाबाद : तिर्थ क्षेत्र म्हणून राज्यातून तसेच देशाच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने तुळजापूर येथे येत असतात. त्यांना सुविधा मिळाव्यात म्हणून तुळजापूरच्या विकासाबरोबरच तालुक्यात औद्योगिक विकास करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एमआयडीसी स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राज्य शिष्टाचार, माहिती व जनसंपर्क आणि विधी व न्याय विभागाच्या राज्य मंत्री आदिती सुनिल तटकरे यांनी आज तुळजापूर येथे दिली.
तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.धार्मिक तिर्थ क्षेत्र म्हणून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यातून तसेच देशभरातून भक्त येत असतात. ही बाब लक्षात घेऊन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तुळजापूर विकास विशेष प्राधिकरणाची स्थापना केली होती. त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेतलेली कामे 70 ते 80 टक्के पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामेही करण्यात येणार आहेत,
असे सांगून आदिती तटकरे म्हणाल्या, आज येथे महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून काही निवेदने दिली आहेत. त्यात विविध विकास कामांची मागणी केली आहे. त्यापैकी तुळजापूर येथे औद्योगिक वसाहत(एमआयडीसी) स्थापन करण्याचीही एक मागणी केली आहे. ही एमआयडीसी स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग विभागाचे मंत्री आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. ही औद्योगिक वसाहत स्थापन होऊन येथे उद्योग स्थापन झाले तर स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आमच्या सरकारचा हेतू आहेच, असेही त्या म्हणाल्या.
तुळजापूरचा तिर्थ क्षेत्र म्हणून वेगाने विकास होत आहेच पण त्यास अधिक गती देण्यासाठी आणि आणखी मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. केंद्र सरकारच्या तीर्थ प्रसार योजनेतून काही सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे सांगून आदिती तटकरे म्हणाल्या, सध्या कोरोनाची साथ वेगाने पसरत आहे.
त्यामुळे तुळजापूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या, मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या आणि मंदिर परिसरातून दुकानदार-व्यावसायिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनांचे व नियमांचे पालन करण्यात यावे. मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करावा. ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने आदिती तटकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.