आंबेगाव तालुक्यातील साकोरेमळा (शिंगवे) शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेतील उल्लेखनीय यशाबद्दल कुणाल एरंडे या विद्यार्थ्याचे विशेष कौतुक
आंबेगाव : शिष्यवृत्ती व राज्यस्तरीय विविध स्पर्धा परीक्षांमध्ये साकोरे मळा (शिंगवे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंदाही घवघवीत यशाची परंपरा कायम राहिली. राज्यस्तरीय (२०२०) सामान्यज्ञान परीक्षेत उल्लेखनीय यश आणि नॅशनल स्कॉलर सर्च (२०१९-२०) परीक्षेतील यशाबद्दल कुणाल शेखर एरंडे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्या हस्ते कुणाल एरंडे याचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळेचे सन २०२०-२१ पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत (इयत्ता पाचवी) १६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तर मंथन परीक्षेत १७ विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
पाचवीतील नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा व पहिली ते चौथी इयत्तेतील विविध स्पर्धा परीक्षेतील राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी व शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक बाबाजी गाढवे, मार्गदर्शक शिक्षक नितीन शेजवळ, मार्गदर्शक शिक्षिका संगीता वाव्हळ यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
साकोरेमळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ, ग्रामस्थांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशाचे आंबेगाव तालुक्यात कौतुक होत आहे.