छोट्या व्यावसायिकांना मदतीचा हात द्या
आढळराव पाटील यांचे आवाहन : शर्यती स्थगित झाल्याने नुकसान
मंचर : लांडेवाडी येथील बैलगाडा शर्यत अचानक स्थगित झाल्याने तेथे विविध व्यावसायांच्या माध्यमातून आलेल्या दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्वतः आर्थिक मदत करुन प्रसार माध्यमांच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. छोट्या व्यावसायिकांनी आढळराव पाटील यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत नववर्षाच्या पहिल्या दिवशी लांडेवाडी येथे होणार होती. यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली. अनेक वर्षानंतर यात्रा पार पडणार असल्याने सुमारे 200 छोटे-मोठे व्यावसायिक दुकानदार यात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते. शर्यतीच्या घाटाच्या आसपास यात्रेच्या आदल्या दिवशी दुकाने थाटून या व्यावसायिकांनी रात्र अक्षरशः थंडीत कुडकुडत काढली; मात्र रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेसाठी दिलेली परवानगी स्थगित केल्याने यात्रा रद्द करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका व्यावसायिकांना बसला आहे.
अनेक दिवसानंतर यात्रा होणार असल्याने चांगला व्यवसाय होईल यासाठी त्यांनी मोठे भांडवल गुंतवले होते; मात्र शर्यती रद्द झाल्याने हा खर्च वाया गेला. भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे म्हणाले, हॉटेल व्यवसायिकांनी खाद्यपदार्थ अक्षरशः फेकून दिले. अनेक व्यावसायिकांना यामुळे रडू कोसळले.
शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यावसायिकांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. समाज माध्यमातून त्यांनी एक संदेश दिला आहे. प्रशासनाने कुठलीही पूर्वकल्पना न देता लांडेवाडी येथील बैलगाडा शर्यत स्थगित केली. यात्रेसाठी अनेक व्यवसायिक टपरीधारक यांनी स्टॉल लावले होते; मात्र त्यांचा संपूर्ण खर्च अक्षरशः वाया गेला आहे. शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.
या हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना झालेल्या आर्थिक त्रासातून बाहेर काढण्यासाठी शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सढळ हाताने शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आवाहन आढळराव-पाटील यांनी केले आहे. ही मदत लांडेवाडी येथील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करुन आपली मदत एकत्र करुन त्यात माझाही सहभाग नोंदवून सर्व नुकसान झालेल्या व्यावसायिकांना लवकरच अर्थसहाय्य करण्यात येईल. असे आढळराव पाटील यांनी सांगितले
बैलगाडा शर्यत रद्द झाल्यानंतर व्यावसायिकांचे जे नुकसान झाले होते. त्याबाबत सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे; मात्र आढळराव पाटील यांनी त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याने या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. गुगल पे किंवा फोन पे वरुन मदत पाठविण्यासाठी 9850588588 हा नंबर जाहीर करण्यात आला असल्याचे भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे यांनी सांगितले.