पुणे जिल्हा परिषदे कर्मचाऱ्यांसाठी “हॅपी न्यू-इयर’ मोहीम
पुणे : जिल्हा परिषदेमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी पहिल्यांदाच “हॅपी न्यू-इयर’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आणि सेवानिवृत्तीच्या दिवशी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निवृत्तिवेतन मंजूर केले जात आहे. 1 एप्रिल 2022 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या 251 असून, त्यातील 243 निवृत्तिवेतनाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निवृत्तवेतन मिळविण्यासाठी कार्यालयात खेटे घालावे लागतात. कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच निवृत्तिवेतन मिळाल्यास त्यांना भविष्यात होणारा त्रास कमी होतो. पुणे जिल्हा परिषदेमधील सामान्य प्रशासन विभागातील 45, आरोग्य विभागातील 44 कर्मचारी निवृत्त होणार असून, त्या सर्वाचे निवृत्तिवेतनाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. आरोग्य विभाग 44, शिक्षण (प्रा) 147 कर्मचाऱ्यांपैकी 140 प्रस्ताव मंजूर झाले. तर उर्वरित सात प्रस्ताव प्रलंबित आहेत.
बांधकाम विभागातील सहा, कृषी दोन, पशुसंवर्धन एक तर अर्थ विभागातील सहा कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यातील एक प्रस्ताव प्रलंबित आहे. ग्रामपंचायत, लघू पाटबंधारे व महिला व बाल कल्याण विभागातील एकही कर्मचारी सेवानिवृत्त होत नाही. कुटुंब निवृत्तिवेतनाचे 36 प्रस्तावांपैकी 33 मंजूर झाले असून, 3 प्रस्ताव प्रलंबित आहेत.