तब्बल 1600 पोलीस कर्मचाऱ्यांची करोना चाचणी
कोरेगाव भीमा येथे आरोग्य विभागाकडून मोहीम सुरू
शिरूर : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे 1 जानेवारी शौर्यदिनी होणाऱ्या विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमसाठी कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, वढू बुद्रुक आदी ठिकाणी बंदोबस्त करण्यात आला आहे. सध्या काही प्रमाणात करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची देखील करोना तपासणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने खबरदारी म्हणून बंदोबस्तातील तब्बल 1600 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची करोना तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या कारंडे, डॉ. वर्षा गायकवाड, डॉ. अर्चना कांबळे, प्रयोगशाळा अधिकारी मयूर नरवडे, वैशाली करमरकर, संदीप कुडाने, प्रशांत शिंगाडे, सोनवणे, आरोग्य सहायक जालिंदर मारणे, अशोक गायकवाड, गंगाराम कोकडे, संतोष थिटे, संतोष चोपडा, राजेश चांदणे, पांडुरंग पाटोळे यांसह आशा सेविकांनी विशेष परिश्रम घेत बंदोबस्तासाठी आलेल्या 1600 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची करोना आरोग्य चाचणी केली आहे.
पोलीस बंदोबस्तात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची काळजी आरोग्य विभाग घेत असून बंदोबस्त असलेल्या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची करोना चाचणी होत आहे. आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचेच आहे.
– सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस स्टेशन