खोडवा छाटणी, फोडणी यंत्राचे प्रात्यक्षिक
झारगडवाडीत बारामती स्टील वर्क्सकडून निर्मिती
बारामती : शेतकऱ्यांच्या उपयुक्त नाविन्यपूर्ण अशी अवजारे बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील बारामती स्टील वर्क्सने बनवली आहेत. खोडवा, फोडणी आणि खोडवा कटिंग करणारे आधुनिक पद्धतीचे नवीन अवजार शेतकऱ्यांच्या उपयुक्त तयार केले आहे. हे अवजार ऊस खोडव्याची छाटणी तसेच खोडव्याची फोडणी नांगराच्या साह्याने करीत आहेत. त्यामुळे एकाच अवजारात दोन्ही कामे केली जात आहेत. अवजारांचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करीत आपल्या शेतीमधील उत्पन्न वाढवले पाहिजे, यासाठी झारगडवाडीतील शेतकरी गोपीनाथ धनाजी बोरकर यांच्या शेतात अवजाराच्या माध्यमातून ऊस खोडवा कटिंग व खोडवा फोडणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी बारामती स्टील वर्क्सचे संचालक ज्ञानेश्वर सणस, अमोल पन्हाळे, शेतकरी विनोद शेळके, गणेश गोळे, हनुमंत झारगड, प्रवीण बोरकर, जनार्दन बोरकर, बाळासाहेब निकम, नागेश बोरकर, शेतकरी उपस्थित होते.
अवजार यंत्रामुळे ऊस फुटवा जादा
सध्या छत्रपती, माळेगांव, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या भागातील ऊस तोडणी सुरू आहे. ऊस तोडणीनंतर अनेक शेतकरी खोडवा पीक घेत असतात. मात्र, ऊस हा बुडापासून न तोडल्यामुळे ऊसाची उगवणी चांगल्या प्रकारे होत नाही. त्यामुळे याचा तोटा शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे तोडलेल्या उसाचे कटिंग योग्य प्रकारे होणे गरजेचे असते. या अवजार यंत्राच्या साहाय्याने ऊस खोडव्याची छाटणी जमिनीबरोबर आणि बाजूची माती मोकळी होत असल्याने जमिनीत हवा खेळती राहत आहे. ऊस फुटवा देखील चांगल्या प्रकारे होतो. अवजार यंत्राचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे.
चळी पाडणे, हरभरा, गहू, मका, बाजरी, ज्वारी, सोयाबीन हा सर्व पेरण्या एकाच अवजारात होतील अशा पद्धतीने अवजार यंत्र आमच्या कंपनीनकडून बनवण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा मजुरावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. वेळही मोठ्या प्रमाणात जातो. त्यामुळे अवजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पैशाची बचत होणार आहे.