जिल्ह्यात पावणेपाच हजार बालके विविध आजारांनी ग्रस्त
0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणीतून बाब उघड
पुणे : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) जिल्ह्यातील 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात 4 हजार 768 बालकांना विविध आजार असल्याची माहिती समोर आली. त्यात 233 बालकांना जन्मजात व्यंग असून, कान-नाक-घशाचे आजार असलेल्यांची संख्या 2 हजार 21 आहे. तर, डोळ्यांचा त्रास असलेल्यांची संख्या 1 हजार 290 इतकी आहे.
“आरबीएसके’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 3 लाख 35 हजार बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यातील आतापर्यंत दोन लाख 31 हजार 195 बालकांची तपासणी पूर्ण झाली. या बालकांची संपूर्ण माहिती चाईल्ड हेल्थ ट्रॅकींग सिस्टिममध्ये नोंदविली जात आहे. अंगणवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांची शाळेत जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे काही प्रमाणात खंड पडला होता. आता पुन्हा आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांतर्गत शालेय विद्यार्थी आणि बालकांच्या आरोग्य तपासणीत कर्करोग (कॅन्सर) आणि हृदयाला छिद्र असलेल्या मुलांवर (सीएचडी, व्हिएसडी) मुंबईत उपचार केले जाणार आहे. तसेच इतर आजाराचे निदान झाल्यास त्याच्या संपूर्ण उपचारासाठी पुणे जिल्ह्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालये निश्चित केली आहेत. जन्मजात व्यंग असलेले 233, बालकांचे आजार 325, कमकुवत एक हजार 345, कान-नाक-घशाचे आजार असलेल्या बालकांची संख्या दोन हजार 21, डोळ्यांचे आजार 1290 बालकांना असून, 554 जणांना त्वचा विकार असल्याची माहिती आतापर्यंच्या पहाणीतून समोर आली आहे.