BIG BOSS MARATHI 3 # विजेतपद पटकावल्यानंतर विशाल निकमची पहिली प्रतिक्रिया…
बिग बॉसचे विजेतपद पटकावल्यानंतर विशाल निकमची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “माझ्यावर विशाल प्रेम करणाऱ्या…”
मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसऱ्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा अखेर झाली आहे. अभिनेता विशाल निकम याने बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाचे विजेतपद पटकावलं आहे. तर जय दुधाणे याने उपविजेत्याचा मान पटकावला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. बिग बॉसचे विजेतपद पटकावल्यानंतर विशालने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
विशालने इन्स्टाग्रामवर नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यावेळी विशाल म्हणाला की , “रामकृष्ण हरी माऊली. मी आता हा व्हिडीओ कशासाठी केला सांगा पाहू, आई शप्पथ सांगतो विशालियन आणि माझ्यावर विशाल प्रेम करणारे तुम्ही लोक नसता तर आज हे मिळालं नसतं.”
“खरंच मनापासून खूप खूप आभार. ही मिळालेली गोष्ट फक्त माझी नाहीय तर सर्व विशालियनची आहे. माझ्यावर विशाल प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षक माय माऊलींची आहे. हे तुमच्यासाठी….चांगभल,” असे विशालने सांगितले.
“तुमची साथ आणि माऊलींचा आशीर्वाद. सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. मी नेहमीप्रमाणे हेच म्हणेन की, आईशप्पथ सांगतो, तुम्ही होतात म्हणून मी इथवर आलो आणि आता ही ट्रॉफी हातात घेतली. या गावातून येणाऱ्या पोराला तुम्ही आज महाराष्ट्राचा फेव्हरेट केलाय, बिग बॉस सिझन ३ चा विजेता बनवलाय. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. ही तर फक्त सुरुवात आहे,” अशा शब्दांत विशालने ट्रॉफी जिंकल्यानंतर आनंद व्यक्त केला होता.
दरम्यान यानंतर सर्वत्र विशाल निकम याचे तोंडभरुन कौतुक केले. बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर विशालच्या नावाचा ट्रेंडही सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियावरही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.