नववर्ष स्वागतासाठी सिंहगड, खडकवासला सज्ज
सार्वजनिक ठिकाणांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर
खडकवासला : नवीन वर्षापासून सारे काही सुरळीत व्हावे, अशा मानसिकतेत समस्त तरुणाई असल्याने यंदाच्या ‘न्यू इअर पार्टी’चे बेत आखण्यास सुरुवात झाली आहे. त्यातील काहींचा कल नेहमीप्रमाणे शहराच्या हद्दीबाहेरील हॉटेलकडे असला तरी करोनामुळे दक्षता म्हणून अनेकांनी फार्म हाऊस आणि शहराच्या परिघातील मित्रांच्या बंगल्यांमध्ये बेत आखण्यास सुरूवात केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सिंहगड, खडकवासला, पानशेत परिसरात मुंबई, पुणे शहराच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
2021 वर्षाला अलविदा म्हणत 2022 या वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यासाठी मित्रमंडळींचे व्हॉट्सऍप ग्रुप सक्रिय झाले आहेत. तीन-चार दिवसांपासून पानशेत मार्गावर खडकवासला, सिंहगड, पानशेत परिसरात वाहनांची गर्दी दिसून येत आहे. 31 डिसेंबर व पुढे पाच सहा दिवस ही गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक, पर्यटकांना बाहेर पडता न आल्याने पर्यटकांना पश्चिम हवेली तालुक्याचे आकर्षण निर्माण झाले आहे.
नववर्ष स्वागतासाठी बंदोबस्तात स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या बरोबरीला शहरातील विविध भागात विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग आणि होमगार्ड यांच्यामार्फत देखरेख ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या माध्यामातूनही विविध ठिकाणी पोलिसांची नजर राहणार आहे. दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये. याची दक्षता पोलिसांकडून घेतली जाणार आहे.
महिलांसोबत छेडछाडीच्या घटना घडू नयेत. यासाठी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच धरण क्षेत्रात दुर्घटना घडू नये यासाठी पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून हॉटेल आणि लॉजचीही तपासणी केली जाणार आहे. परिसरातील बार आणि हॉटेल पार्टीवरही पोलिसांची नजर राहणार आहे, अशी माहिती हवेली पोलीस पोलीस स्टेशन निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.