खिल्लार बैलांची किंमत 15 ते 20 टक्क्यांनी वाढली
बेल्हे बाजारात जनावरे मालकांना सुगीचे दिवस
बेल्हे – सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर पुन्हा एकदा ‘या’ अर्थकारणाला सुगीचे दिवस आले आहेत. बेल्हे (ता. जुन्नर) या गावात भरणाऱ्या सर्वात मोठ्या बैल बाजारात बैलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे, त्यामुळे खिल्लारी बैलांची किंमत 15 ते 20 टक्क्यांनी वाढली आहे.
गेल्या 7 वर्षांपासून राज्यातले विविध नेते या विषयावर न्यायालयीन लढा देत होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचं मोठे अर्थकारण असते; परंतु मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ही सर्व व्यवस्था कोलमडली होती. दरम्यान, बेल्हा येथे भरणारा बैलबाजार हा पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर भरला जाणारा सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. गावठी, खिलार, भडुशी, जर्सी असे विविध जातीचे बैल या बाजारात विकण्यासाठी येतात.
सर्वसाधारण बैलांना या बाजारात किमान 30 ते 60 हजारांपर्यंतचा भाव मिळतो. बैलाचा रंग, शिंगे, वाशिंग, दात आणि उंची यावरुन प्रत्येक बैलाची किंमत ठरते. करोनामुळे हा बाजार गेली दोन वर्षे बंद होता. ज्यामुळे मालकांची उलाढालही कमी झाली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना आता आधार मिळाला आहे. दरम्यान, बैलगाडा शर्यतींमध्ये खिलार जातीच्या बैलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. घाटात जोरात पळू शकणारे हे बैल प्रत्येक बैलगाडा मालक वाट्टेल ती किंमत मोजून विकत घेत असल्याने या बैलांचा भाव वधारला आहे.