चाळकवाडी टोल कर्मचाऱ्यांची “दादागिरी’
मद्यपान करून वसुली : माजी आमदारांच्या कन्येने अनुभवला मुजोरपणा
जुन्नर : पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी (ता. जुन्नर) टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या “दादागिरी’त वाढ झाली असून, ही दबंगगिरी स्थानिकांना त्रासदायक ठरत आहे. दारूच्या नशेत बेधुंद असणाऱ्या टोल वसुली कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा मोहोळचे माजी आमदार तथा राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे त्यांच्या कन्या कोमल ढोबळे-साळुंके यांना अनुभवण्यास मिळाला.
सोमवारी (20 डिसेंबर) चारच्या वाजेच्या सुमारास कोमल ढोबळे-साळुंके या पुण्याच्या दिशेने जात होत्या. पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाक्यावर त्यांच्या गाडीचा तांत्रिक समस्येमुळे फास्टॅगचे स्कॅनिंग झाले नाही. यावेळी स्थानिक टोल कर्मचाऱ्यांना त्यांनी त्यांची ओळख माजी आमदार ढोबळे यांची कन्या अशी करून दिली; मात्र मद्यधुंद अवस्थेतील एका कर्मचाऱ्याने त्यांना अरेरावी केली. त्यांनी माजी आमदार ढोबळे यांचे कार्ड दाखवले असता कोण आमदाराची लेक आम्ही ओळखत नाही पैसे भरा आणि मगच गाडी सोडेल, अशी दमबाजी केली.
यावेळी त्यांनी रोख स्वरूपात टोल भरण्यासही सहमती दर्शवली; मात्र दारूच्या नशेत बेधुंद कर्मचाऱ्याने अर्वच्च भाषेचा वापर करत तुम्ही पैसे दिले तरी गाडी सोडणार नसल्याची धमकी दिली. त्यानंतर कोमल ढोबळे-साळुंके संतापल्या त्यांनी यावेळी टोल कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. टोल कर्मचारी माफी मागत नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याचा इशारा दिला. तुम्ही पैसे दिले तरी गाडी सोडणार नाही अशा प्रकारे महिलेला वागणूक देता का असा सवाल विचारला. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, दारूच्या नशेत बेधुंद कर्मचाऱ्यांने धूम ठोकली. बऱ्याच वेळाने तेथील एका कर्मचाऱ्याने माफी मागितली. काही प्रवाशांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. संबंधित व्हिडीओ कोमल ढोबळे-साळुंके यांनी सोशल मीडियावर स्वतः पोस्ट केला आहे. आजी-माजी आमदाराच्या मुलांना जर अशी वागणूक मिळत असेल, तर सामान्य माणसाचे काय असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.
स्थानिकांना डावलून…
स्थानिकांना डावलून परराज्यातील कर्मचाऱ्यांना टोल वसुलीला बसविले आहे. शिवाय टोल कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत स्थानिक नागरिकांसह महिला प्रवाशांना ही अश्लील भाषेत शिवीगाळ करतात. त्यामुळे परप्रांतीय आणि परजिल्ह्यातील टोल कर्मचाऱ्यांना तात्काळ हटवून त्या जागी स्थानिक सुशिक्षित तरुणांना काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.