जमीन खरेदी-विक्रीला फसवणुकीचे ग्रहण
हवेलीतील समाविष्ट गावांत बनावट एजंटांचा सुळसुळाट
हवेली : पुणे शहराचा उपनगरीय भाग म्हणून वाघोलीची ओळख आहे. पुणे महानगरपालिकेत 23 गावांचा समावेश झाला आहे. भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेला भाग असून, भागात बांधकाम क्षेत्राशी निगडित अनेक लहान-मोठे व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. बांधकाम व्यवसायाचा पाया असणाऱ्या वाघोलीत जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहारांना सध्या फसवणुकीचे ग्रहण लागले आहे.
जमिन खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी मूळ मालकाच्या ऐवजी अन्य बनावट व्यक्तींना उभे करून त्यांचे बनावट आधार कार्ड तयार करून त्याद्वारे अधिकार पत्र किंवा जागेच्या खरेदी-विक्रीसाठी विसार पावती तयार करून त्याद्वारे करोडो रुपयांच्या जमिनी कवडीमोल किमतीत विकत घेण्यासाठी व त्या जमीनी इतरांना विकण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे.
मूळ जमिनीचे मालक मयत किंवा त्यांच्या वारसाचा राज्याबाहेर किंवा परदेशातील पत्ता माहीत असताना देखील केवळ संबंधित व्यक्ती जागेकडे निगराणी करण्यासाठी येत नाही किंवा त्या व्यक्तीचे जमिनीकडे लक्ष नाही, याचा फायदा घेत त्या व्यक्ती ऐवजी दुसरी व्यक्ती उभी करून जमिनीचे व्यवहार करण्याचा प्रकार सुरू झाला आहे.
बनावट आधार कार्ड, बनावट व्यक्ती तसेच खोटे साक्षीदार उभे करून जमिनींचे अधिकार पत्र तसेच त्या जमिनी बाबत विसार पावती तयार करून काही राजकीय तसेच गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना हाताशी धरून त्या जागेवर केवळ व्यवहार झाला आहे हे दाखवून तातडीने ताबा टाकून मूळ मालकाकडून ताबा काढण्यासाठी करोडो रुपयांचा व्यवहार करून जमिनीत फसवणुकी द्वारे खंडणी वसूल करण्याचा प्रकार सध्या सुरू झाला आहे. यात जिल्हास्तरावरील राजकीय पक्षांच्या तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा मोठा समावेश आहे.
वाघोली येथील गट नंबर 1276/38 मधील चार हेक्टर जागेचे बनावट अधिकार पत्र व आधार कार्ड बनवून मूळ मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिल राजाराम सणस यांनी फिर्याद दिली. नोव्हेंबर 21 ते आजपर्यंत आरोपी यांनी सुमन लोंढे ही अपर्णा यशपाल वर्मा असल्याचे भासवून वाघोली हद्दीत असणारी गट नंबर 1276/38 मधील 4 हेक्टर जागा बळकावण्याचा व बनावट अधिकार पत्र विश्वनाथ तात्याबा कांबळे यांना नोटराईज करून ते खरे आहे असे भासवून त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.
याप्रकरणी सुमन सुमन दत्ता लोंढे (रा. वारजे पुणे), मनोज एकनाथ शिंदे (रा. शिरूर), राजेंद्र रमेश सोदे (रा. वारजे माळवाडी) या तीन व्यक्तीविरोधत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशा घटनांत सध्या वाढच होत आहे.
रॅकेट उघड होण्याची शक्यता
सावकारीच्या गुन्ह्यांबाबत ज्याप्रमाणे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडून नागरिकांसाठी तक्रार नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी खरेदी विक्रीबाबत फसवणुक प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या प्रकरणातील सर्वांवर कडक कारवाईची गरज आहे. त्यामुळे जमीन माफियांचे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.