बैल, घाट, घोडी सज्ज घोडेस्वाराची प्रतीक्षा
बैलगाडा मालक तयारीत : शिरूर तालुक्यात बैलगाडा घाटाचे सुशोभीकरण सुरू
शिरूर : शिरूर लोकसभा मतदार संघातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत आणि हीच शर्यत गेली अनेक वर्षे पेटा संस्थेने आक्षेप घेतल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद होती. नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने नियम व अटी घालून बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत सर्वच स्तरांतून झाले. गावागावांत फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला गेला. बैलगाडा मालक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रतिक्षा करीत आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आणि बैलगाडा शर्यत सुरू होणार, असे आश्वासन दिले होते. एवढंच काय तर ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी पहिल्या बारी म्होरं घोडी धरणार, असेही छातीठोकपणे सांगितले होते आणि बैलगाडा मालकांचा विश्वास संपादन केला होता.
दरम्यान आता बैलगाडा शर्यत सुरू झाली आहे. पहिल्या बारी पुढे घोडी धरणार असल्याचे आश्वासन दिलेल्या खासदार डॉ. कोल्हे यांची प्रतिक्षा आहे. सद्या ते दिल्लीत आहेत. तर इकडे घाटांचे सुशोभीकरण सुरू झाले आहे. त्याचबरोबर घोडी आणि बैल देखील सज्ज झाले आहेत. आता घोडेस्वार म्हणजेच डॉ. कोल्हे यांची आम्ही वाट पाहतोय, अशी प्रतिक्रिया खासदारांचे समर्थक देत आहेत.
दरम्यान शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील खासदार असताना शर्तीचे प्रयत्न केले. न्यायालयात स्वखर्चाने वकील देऊन बाजू मांडण्याचा देखील प्रयत्न झाला. शर्यती बंद असल्याने शेतकरी बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन हवालदिल झाले होते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडुन बैलगाडा मालक अपेक्षा करीत होते. दरम्यान पहिल्याच संसद अधिवेशनात बैलगाडा विषय आग्रहाने मांडला. त्यावेळी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी परदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय होऊ शकतो.
यातूनच पर्यटन वाढीसाठी व रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी भूमिका मांडून केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री गिरीराज सिंह यांची भेट, पशुसंवर्धन खात्याचे सचिव ओ. पी. चौधरी यांच्या समवेत बैठक, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर बैल हा प्राणी संरक्षित प्राण्याच्या यादीतून वगळण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री परशोत्तम रुपाला यांची भेट या सर्व प्रक्रियेत डॉ. कोल्हे यांना विश्वास आला होता की बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होतील, याची सगळी माहिती ओझर येथे बैठक घेऊन बैलगाडा मालकांना दिली. मात्र त्यावेळी बैलगाडा मालक देखील आक्रमक झाले होते मात्र डॉ. कोल्हे हे बैलगाडा मालकांची समजूत काढण्यात यशस्वी झाले होते
सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने सुनावणीसाठी अर्ज करण्याची मागणी सातत्याने डॉ. कोल्हे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे करीत होते. त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा देखील पाठपुरावा सुरू होता. अखेर ही लढाई राज्य सरकारने जिंकली आणि बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील मिळाला त्यामुळे आता पहिल्या बारी पुढे खासदार डॉ. अमोल कोल्हे कधी घोडी धरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.