दौंडच्या सहकारात लवकरच रणधुमाळी
आखाडा तापला : 18 सोसायट्यांच्या निवडणुका जाहीर होणार
दौंड : दौंड तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. १८ विकास सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने लवकरच सहकाराच्या आखाड्यात रणधुमाळी शिगेला पोहोचणार आहे.
ग्रामीण भागात गावोगावी स्थापन झालेल्या व शेतकऱ्यांच्या आर्थिक कणा असलेल्या सहकारी सोसायट्यांच्या संचालकांचा कार्यकाल गेल्या वर्षभरापूर्वी संपला आहे. परंतु करोनाच्या महामारीमुळे संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. परंतु आता सहकार विभागाकडून टप्प्या-टप्प्याने संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
त्यापैकी दौंड तालुक्यातील १८ सहकारी संस्थांचा पहिल्या टप्प्यात कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये आलेगाव, मसनेरवाडी, पिलानवाडी, मलठण, हिंगणी बेर्डी, नानगाव, आंबेगाव, यादववाडी, वाखारी, टेळेवाडी, टाकळी भीमा, पाटस, एकेरीवाडी, खेडकरवस्ती, डुबेवाडी, उंडवडी, केडगाव, डाळिंब आदी गावांतील संस्थांचा समावेश आहे.
सध्या प्रारूप याद्या सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केल्या आहेत. २३ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. त्यानंतर मूळ यादी तयार होणार आहे सध्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची चुरस दौंड तालुक्यात पाहावयास मिळत आहे. माजी आमदार रमेश थोरात आणि आमदार राहुल कुल यांच्या गटात प्रतीष्ठतेची लढत झाली आहे.
यात राष्ट्रवादीची कमांड असल्याने आमदार कुलांनी ही निवडणूक एकतर्फी होऊ दिली नाही. जिल्हा बॅंकेची राळ उडाली असताना आता सहकारी सोसायट्यांचा आखाडा लवकरच तापणार आहे.त्यामुळे आर्थिक सत्ताकेंद्रावर कब्जा करण्यासाठी गावकारभारी एकवटले आहेत. त्यात सोसासट्यांच्या माध्यमातून गट संघटीत करता येत असल्याने कारभारी निवडणुकीची रणनिती तयार करीत आहेत.
दौंड तालुक्यातील १८ गावांत सोसायटींची रणधुमाळी शिगेला पोहोचत आहे. ही धग आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत राहणार आहे. त्यामुळे हा आखाडा जिंकण्यासाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
राष्ट्रवादीविरोधात तुल्यबळ लढत होणार का?
दौंड तालुक्यातील अठरा गावांपैकी काही गावे ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. या गावात आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटात तुल्यबळ लढती होणार आहेत. तालुक्यातील सहकारावरील प्राबल्याचा आढावा घेतल्यास राष्ट्रवादीचे माजी आमदार थोरात यांच्या गटाचे वर्चस्व आहे. आता या अठरा गावांत कुल गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तुल्यबळ लढत देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या लढती लक्षवेधी होणार आहेत.