ग्रामीण भागात गुन्हेगारीचा आलेख वाढता
मितेश घट्टे : मंचरमध्ये सुरक्षाविषयक मार्गदर्शन शिबिर
आंबेगाव – करोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे, त्यामुळे बेरोजगारांची पावले गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत. परिणामी ग्रामीण भागात गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाबरोबरच सामान्य नागरिकांनी जागरूकता दाखविणे गरजेचे आहे, असे मत अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी व्यक्त केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे मंचर पोलीस ठाणे आणि धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षाविषयक मार्गदर्शन शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सायबरतज्ज्ञ मुकेश भांदरगे यांनी मार्गदर्शन केले.
शिबिराला लाला अर्बन बॅंकेचे अध्यक्ष निवृत्ती काळे, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक यतीनकुमार हुले, पतसंस्थेचे अध्यक्ष सीताराम लोंढे, उपाध्यक्ष सुनील बाणखेले, संचालक मंगेश बाणखेले, पुरुषोत्तम पटेल, सुदाम बेंडे, दिलीप महाजन, प्रवण थोरात, अश्विनी शेटे, अनिता निघोट, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बाणखेले, उद्योजक आशिष पुंगलिया, महेश मोरे, पिंपळगावचे सरपंच दीपक पोखरकर उपस्थित होते.
आजूबाजूला घडणाऱ्या विविध गुन्ह्यांबद्दल समाजातील प्रत्येक घटकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. समाजविघातक घटनांना आळा बसण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे. सायबर-क्राइम सुरक्षिततेबद्दल तरुणाईला मार्गदर्शन केले पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे म्हणाले की, बॅंका, पतसंस्थांनी आधुनिक सोयीसुविधांचा वापर करून सुरक्षिततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांनी सुरक्षाविषयक सूचनांचा कामकाजात परिपूर्णतेने वापर करावा.
ज्येष्ठ नागरिकांनी परिचित व्यक्तीसोबत असतानाच आर्थिक व्यवहार करण्यास प्राधान्य द्यावे. लाला अर्बन बॅंकेचे अध्यक्ष निवृत्ती काळे, शरद सहकरी बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक यतीनकुमार हुले यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन अमित चिखले यांनी केले. माजी सरपंच अश्विनी शेटे यांनी आभार मानले.