बंदिस्त पाइपलाइनवरून जुन्नरला राजकारण
योजनेस स्थगिती : शिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणात जनता भरडली जाणार
जुन्नर – माणिकडोह धरणातून बंदिस्त पाइपलाइन योजनेच्या विषयांना जुन्नर नगरपालिकेच्या सभेत राष्ट्रवादीकडून स्थगिती मिळाल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जुन्नर शहरातील बंदिस्त पाइपलाइन योजनेवरून राजकारण तापायला सुरुवात झाली असून, राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेनेत पुन्हा वाकयुद्ध रंगणार आहे. मात्र, या दोघांच्या भांडणात जनता भरडली जाणार त्याचे काय?
जुन्नर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 16) पार पडली. यावेळी नगराध्यक्ष शाम पांडे, समीर भगत, सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, सना मन्सुरी, अलका फुलपगार, फिरोज पठाण, जमिर कागदी, भाऊ कुंभार, हजरा इनामदार, समीना शेख, मोनाली म्हस्के, अक्षय मांडवे, नरेंद्र तांबोळी, सुनील ढोबळे उपस्थित होते.
संपूर्ण पाच वर्षे इतका मोठा कालावधी मिळून देखील नगराध्यक्ष जनतेला स्वच्छ पाणी देऊ शकले नाहीत. शिवसेनेच्या नगरसेविका अंकिता गोसावी यांनी देखील शहराला अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे मिटिंगमध्ये सांगितले. जलशुद्धीकरण केंद्राचे काम निकृष्ट झाले, व्यवस्थित काम करून घेतल्यानंतरच या कामाचे बिल अदा करावे असा ठराव करूनही संबंधित ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले.
माणिकडोह धरणातून बंदिस्त पाइपलाइन योजनेला आमचा विरोध नाही, विकासकामांना आमचा कोणताही विरोध नसून, फक्त ती चुकीच्या पद्धतीने होऊ नयेत, जनतेच्या पैशाचा अपव्यय होऊ नये. याच हेतूने फक्त पाणीपुरवठा योजनेशी संबंधित विषयांना स्थगिती देण्यात आली असल्याचे नगरसेवक जमीर कागदी व भाऊ कुंभार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे. पाणी योजनेला आमचा विरोध नाही; परंतु चुकीच्या पद्धतीने काम करण्यास विरोध आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विकासासाठी आजही कटिबद्ध आहे आणि पुढेही राहणार आहे.
– फिरोज पठाण, गटनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस
बंदिस्त पाइपलाइन योजनेचे श्रेय शिवसेनेला व नगराध्यक्ष शाम पांडे यांना मिळू नये याकरिता केवळ विरोधाला विरोध करण्याची मानसिकता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची आहे. विरोधकांची ही भूमिका अत्यंत चुकीची असून, त्यामुळे योजना व जुन्नर शहराच्या विकासास खीळ बसू शकते.– शाम पांडे, नगराध्यक्ष,