शाहू महाराजांनी कुस्ती खेळाला उंची मिळवून दिली
- राहुल सोलापूरकर : चिखलगाव येथे व्याख्यानाचे आयोजन
भोर – शाहू महाराज हे दूरदृष्टी असलेले राजे होते. त्यांनी केलेले पाण्याचे नियोजन भारतासह जगाला लाभदायी ठरले आहे. त्यांच्याकडे वाचन व निर्णय क्षमता दांडगी होती. त्यांनी कुस्ती क्षेत्राला जागतिक उंची मिळवून दिली. शाहू महाराज सर्वसामान्यांच्या आयुष्याला आकार देणारे, भरकटलेल्यांना किनारा दाखवणारे, पुरोगामी विचारांचे राजे होते, असे प्रतिपादन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
चिखलगाव (ता. भोर) येथे आयोजित केलेल्या शाहू महाराज या विषयावरील व्याख्यानात सोलापूरकर बोलत होते. येथील श्री महांकाळेश्वर मंदिरात पुणे नगर वाचन मंदिर आणि चिखलगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राहुल सोलापूरकर म्हणाले की, नाटक, साहित्य, प्रशासन, शिक्षण, उद्योग, शेती आदी क्षेत्रांत महाराजांनी कामगिरी करून सर्वसामान्यांना न्याय दिला. राजकारण्यांनी शाहू महाराजांचे अनुकरण करावे असेही सोलापूरकर यांनी सांगितले. सुमारे दीड तासाच्या व्याख्यानात शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक उदाहरणे आणि प्रसंग सांगून सोलापूरकर यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी विविध नाट्य स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या फडके विद्यालय, रावडीच्या आजी-माजी विद्यार्थी प्राजक्ता आंबवले, चंद्रकांत गोरड, आशा धोंडे आणि कृतिका आंबवले यांचा सन्मान राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, सरस्वती प्रतिष्ठानचे कार्यवाह अमोल जोशी, चिखलगावचे सरपंच सुरेश धोंडे, रावडीचे सरपंच मोहनराव बांदल, राजाराम धोंडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन काका अधिकारी यांनी, प्रास्ताविक रवींद्र पवार यांनी केले. स्वागत आनंद धोंडे यांनी केले, तर रवींद्र दळवी यांनी आभार मानले.