पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीतही आमदार संग्राम थोपटे हॅटट्रिक करणार
"अ'वर्ग मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल
भोर – भोर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज (दि. 6) भोर तालुक्यातून “अ’ वर्ग सोसायटी मतदार संघातून बॅंकेचे विद्यमान संचालक आणि भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती भोर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी दिली.
भोर तालुक्यात सोसायटी मतदारसंघातून 75 सोसायट्यांनी प्रत्येकी एकप्रमाणे 73 प्रतिनिधींचे ठराव पाठवले आहेत. त्यामध्ये कॉंग्रेसचे वर्चस्व असून या मतदार संघातून आमदार संग्राम थोपटे हे 2009, 2014 मध्ये जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून निवडून आले होते. यावेळी तिसऱ्यांदा त्यांनी आपला उमेदवरी अर्ज दाखल केला असून, ते यावेळीही या निवडणुकीत हॅटट्रिक करतील, असा विश्वास कॉंग्रेसच्या गोटात वर्तवला जात आहे.
आमदार संग्राम थोपटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष देविदास भन्साळी, सरचिटणीस श्रीरंग चव्हाण, जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, वेल्हा तालुका पंचायत समितीचे सभापती दिनकरराव सरपाले, राजगड सहकारी साखरकारखान्याचे उपाध्यक्ष विकास कोंडे, संचालक के. डी. सोनवणे, पोपटराव सुके, मारुती गुजर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष धनंजय वाडकर, ज्ञानेश्वर झोरे, जिल्हा कॉंग्रेसचे सचिव मदन खुटवड, दिलीप लोहकरे, सुनील गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेच्या ज्ञानेश्वर शिंदे यांचा अर्ज दाखल
भोर तालुक्यातून शिवसेनेचे ज्ञानेश्वर शिंदे यांचा या पूर्वीच “अ’वर्ग मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखाल झाला असून, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे दिवसानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. “ड’ वर्ग मतदार संघातून बॅंकेचे विद्यमान संचालक भालचंद्र जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, राष्ट्रवादीकडू त्यांनी उमेदवारीसाठी मागणी केली असली तरी यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे बोलले जात आहे.