द्राक्ष बागायतदारांना मदत मिळवून देणार
राज्यमंत्री भरणे इंदापूर तालुक्यात पंचनामे करण्याच्या सूचना
इंदापूर –अवकाळी पावसाने इंदापूर तालुक्यातील द्राक्षाच्या बागांना प्रचंड मोठा फटका बसला आहे. याच कालावधीत ढगाळ हवामानाचा द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे; मात्र नुकसान झालेल्या सर्व द्राक्ष बागायतदारांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणार आहे, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यात तब्बल पाच हजार एकर क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली आहे. तालुक्यातील शेतकरी द्राक्ष उत्पादनासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असतो औषधे खते, सातत्याने वापरून आपल्या द्राक्ष बागा जोपासतो हीच द्राक्ष राज्याच्या बाहेर इंदापूर तालुक्यातील गोडीचा दरारा निर्माण करून तालुक्याचे नावलौकिक वाढवतो. मात्र हातातोंडाशी आलेली द्राक्ष अवकाळी पावसाने व ढगाळ हवामानामुळे नेस्तनाबूत झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून बागायतदार शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणार आहेत.
तालुक्यात सुमारे 5 ते 6 हजार एकर क्षेत्रावर द्राक्षे लागवड आहे. यामध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने व खराब हवामानामुळे तालुक्यातील बोरी, कळस, बिरंगुडी, काझड, शिंदेवाडी, कडबनवाडी, शेळगाव, भरणेवाडी, अंथुर्णे व परिसरातील अनेक भागात अर्ली द्राक्षांचे मणी तडे जाऊन मोठे नुकसान झाले आहे. तसेच मोहोरातील बागांनाही मोठे नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये तालुक्यातील सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षे बागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल.
कृषी सहसंचालकांनी इंदापूर तालुक्यात केली पाहणी
कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचनेनुसार इंदापूर तालुक्यात पाहणी करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुक्यात आगाप द्राक्षे काढणीला नोंव्हेंबर महिन्यात सुरुवात होते. मात्र या वर्षी पडलेल्या अवकाळी व चक्रीवादळ पावसाने ऑगस्ट, सप्टेंबर, महिन्यात छाटणी केलेल्या अनेक बागा वाया गेल्या आहेत. पावसामुळे पक्व झालेल्या बागांना तडे गेले आहेत तसेच मोहर असलेल्या बागांचे गळती होऊन डाऊनी रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.