राष्ट्रवादीने सोडला आघाडीचा “हात’; “एचसीएमटीआर’च्या तीन मार्गांत बदल
मंजुरीसाठी भाजप-राष्ट्रवादी आले एकत्र
पुणे महापालिकेच्या प्रस्तावित “एचसीएमटीआर‘ (उच्च क्षमता द्रुतगती मार्ग) मार्गिकेमध्ये तीन ठिकाणी बदल करण्यात येणार आहेत. दरम्यान, हा प्रस्ताव मुख्यसभेत वादळी ठरला. काही ठराविक व्यावसायिकांसाठी हा बदल केला जात असल्याचा आरोप करत कॉंग्रेस, शिवसेनेसह मनसेने विरोध केला. तर, विषय मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप एकत्र आले. त्यामुळे बहुमताच्या जोरावर हा विषय मंजूर झाला.
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात 24 मीटरचा “एचसीएमटीआर‘ प्रस्तावित आहे. याला मुख्यसभेने मान्यता दिली आहे. यावर हरकती-सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने कोथरुड, कर्वेनगर, वडगावशेरी आणि लोहगाव येथे बदलासाठी प्रस्ताव ठेवला होता. यावर निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप नगरसेवकांनी खास सभेची मागणी केली होती. खास सभेत हा विषय घेताच, मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी याविषयाची संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली.
मात्र, नगरसचिवांनी महापौरांच्या आदेशानुसार आधी उपसूचना तसेच प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मनसे, कॉंग्रेस तसेच शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले. तसेच या प्रस्तावावर माहिती द्यावी, कोणाच्या हितासाठी हा प्रस्ताव आणला जात आहे? अशी विचारणा केली. त्यानंतर मतदान पुकारण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपने प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे 78 विरोधात 16 अशा मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
दरम्यान, मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी सभागृहात माहिती देण्याची मागणी केली. मात्र, शेवटपर्यंत माहिती देण्यात न आल्याने चिडलेल्या मोरे यांनी सभागृहातच कार्यपत्रिका फाडली. तर नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश बागवे यांनीही प्रशासनाच्या कामकाजाचा निषेध केला.
ठराविक व्यावसायिकांच्या फायद्यासाठी मार्गांमध्ये बदल करण्यात येत आहेत. यामुळे पावणेदोन लाख चौरस फुट क्षेत्र हे निवासी करण्यात आले आहे. त्यामुळे याविषयाला आमचा विरोध आहे. प्रशासन तसेच सत्ताधारी चुकीच्या पद्धतीने कामकाज करत आहेत.
– आबा बागूल, कॉंग्रेस गटनेते