पावसाची पावले परतीकडे; संपूर्ण विदर्भासह नांदेडमधून मान्सून परतला
उत्तर भारतातून नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनच्या परतीचे वेध लागले होते. त्यानुसार राज्याच्या विदर्भातील काही भागातून मान्सूनच्या परतीस सुरुवात झाली आहे. मागील 24 तासांत संपूर्ण विदर्भातून मान्सून परतल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे.
नैऋत्य मान्सूनने गुजरातमधून पूर्णपणे आणि मध्य प्रदेशच्या काही भागातून माघार घेतली आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील विदर्भ भाग, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालचे आणखी काही भाग संपूर्ण सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालॅंड आणि मणिपूर आणि तेलंगणाचा काही भाग, मिझोराम आणि त्रिपुरा या भागातूनही मान्सूनने माघार घेतली.
नैऋत्य मान्सूनची माघार रेषा आता लेंगपुई, कोलकाता, बारीपाडा, मलकनगिरी, हनमकोंडा, औरंगाबाद आणि सिल्वासा या भागातून जात आहे. पुढील दोन दिवसात महाराष्ट्र आणि तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागांमधून नैऋत्य मोसमी माघार घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.