पुणे जिल्हा : पत्नीचा खून करून विहिरीत पुरला मृतदेह; विचारल्यावर सांगितलं मारून टाकलं तिला…
दौंड तालुक्यातील वाखारी येथे गावात फिरून कोळसा गोळा करणाऱ्या मजुराने पत्नीचा खून करून तो शेजारच्या जागेत असलेल्या विहिरीच्या खरपामध्ये पुरला असल्याची धक्कादायक घटना घडली. यवत पोलिसांनी याप्रकरणी पतीला अटक केली आहे. रमेश सुंदर वाघमारे (वय 30 रा. कोरली, ता. मुरूड, जि. रायगड, सध्या रा. वाखारी, ता. दौंड), असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. 8) सकाळी 11 च्या सुमारास वाखारी येथील पिरबाबा दर्गाजवळ ही घटना घडली.
यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेली माहिती अशी, रमेश सुंदर वाघमारे कुटुंबासह वाखारी येथे राहत आहे. पत्नी माया हिच्याबरोबर पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. या वादातून रमेश याने पत्नी मायाला मारहाण केली. मारहाणीत तिचा मृत्यू झाला. रमेश याने तिचा मृतदेह शेजारच्या जागेत असलेल्या विहिरीच्या खुरपात पुरून टाकला.
दरम्यान, कोळसा व्यापारी नितीन सुरेश ठोंबरे हे कामानिमित्त वाखारी येथे रमेश वाघमारे याच्याकडे आले. त्यावेळी तुझी बायको कुठे आहे, असे विचारले. त्यावेळी तिला मी मारून टाकल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर नितीन ठोंबरे यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपी रमेश वाघमारे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले करीत आहेत. दरम्यान, माया हिला चार मुले असून तिच्या मृत्यूनंतर मुले अनाथ झाली. यवत पोलिसांनी या मुलांची जेवणाची व्यवस्था करून तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था केली आहे.