कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीने वागण्याची गरज
‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखून विषाणूंविरुद्धचे हे युद्ध जिंकण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केलेली आहे, असे असले तरी ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले, त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेस आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य सर्वश्री डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता, यांच्यासह राज्यभरातील डॉक्टर्स, नागरिक आणि या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आज कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात मग आज ही चर्चा कशासाठी? तर कारण स्पष्ट आहे. जगभरातील देशात तिसऱ्या लाटेचा अनुभव कटु आहे, आकडे ही स्थिती स्पष्ट करतात. जर तिसरी लाट अपरिहार्य असेल, ती येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे. पण प्रार्थनेच्या पुढे एक पाऊल पुढे टाकले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून ही परिषद त्या प्रयत्नांचाच एक भाग असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्धचे जर हे युद्ध आहे असं आपण मानतो तर आपली सगळी शस्त्रे परजवून ठेवण्याची गरज आहे. मग आपली शस्त्रे काय आहेत, तर डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी सगळेच कोरोना योद्धे आहेत, त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री, औषध उपलब्धता या सगळ्या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. अजून राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता सांगितली जात आहे मग त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे त्यासाठी आपणही सज्ज राहण्याची आवश्यकता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
रुग्णालयांनी ऑडिट करून घेण्याचे आवाहन
आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. आरोग्य सुविधा मग ते ऑक्सिजन, रुग्णशय्या, औषधे, व्हेंटिलेटर्स असो की अन्य इलेक्ट्रिक यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी या गोष्टींचे ऑडिट करून घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.