फूलगावमध्ये एमआयटी महाविद्यालयाचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीर
शिबिरामध्ये सात दिवस विविध उपक्रमांचे आयोजन
फुलगाव । सह्याद्री लाइव्ह । एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी यांच्या वतीने सोमवार ०८ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीसाठी फूलगाव येथे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरादरम्यान फुलगाव येथील भीमा नदी, पेशवेकालीन कमानी घाट, ऐतेहासिक मंदिरे या स्थळांची स्वच्छता करण्यात आली. तसेच शनी मंदिर परिसर व डोंगर या ठिकाणी २२० वृक्षांची लागवड करण्यात आली. हरी उद्धव धोत्रे शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवड वाचनाची अंतर्गत ग्रंथदिंडी तसेच कथा सांगणे, खेळणी बनवणे असे अनेक उपक्रम अक्षरभारती संस्थेच्या सहयोगाने घेण्यात आले.
फुलगाव येथील शाळेतील ३०० हुन अधिक विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यांच्या मदतीने भारत असे अक्षर हातात पुस्तक घेऊन तयार करून एक अनोखा उपक्रम यावेळी राबवण्यात आला. शिवराज्याभिषेक ३५० वे वर्षे तसेच जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून ३५० दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला.
वेदप्रकाश गोयल मतिमंद मुलांच्या शाळेत मुलांसाठी चित्रकला, संगीतखुर्ची असे खेळ घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर आनंद साजरा केला. शिबिरादरम्यान वारसा स्थळांची माहिती गोळा करण्यात आली. शिवव्याख्याते राजगुरू, डॉ .अनिकेत नागाने, प्रो. दीक्षा कदम, डॉ. अर्चना आहेर, बायाडाबाई पवळे, शिवप्रसाद जाधव, सुनील वागस्कर, विठ्ठल शिंदे, डॉ. वाघमारे इत्यादी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग देशसेवेसाठी करावा असे आवाहन गट विकास अधिकारी शिरीष मोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलताना केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. शिबिराचे नियोजन रासेयो अधिकारी अरविंद वागस्कर यांनी केले. शिबिराला माजी सरपंच मन्दानानी साकोरे, शरद वागस्कर, नारायण खुळे, विजय खुळे डॉ. मंगेश भोपळे, डॉ. पद्मावती उंडाळे, डॉ. कीर्ती रासकर, डॉ. भारती कवाडे, प्रो. श्रद्धा लिंगे, प्रो. निशिगंधा भालेकर, प्रो. सुषमा चाळके यांनी भेट दिली.
शिबिराचे उदघाटन हरी उद्धव धोत्रे शाळेचे मुख्याध्यापक भांबरे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन सुरवात झालेल्या या शिबीराची विठ्ठलाच्या भजनाने सांगता झाली.